Satara Elections : जिल्ह्यातील 973 ग्रामपंचायतींचे लवकरच धूमशान Pudhari
सातारा

Satara Elections : जिल्ह्यातील 973 ग्रामपंचायतींचे लवकरच धूमशान

प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; गावोगावी उत्सुकता शिगेला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम ग्रामविकास विभागाने जाहीर केला आहे. प्रभाग रचनेचे काम दि. 20 रोजीपासून सुरू करण्यात येणार आहे. दि. 4 मे रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. आगामी काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे 973 ग्रामपंचायतींचा समावेश असून, सर्वाधिक ग्रामपंचायती सातारा तालुक्यातील 140 इतक्या आहेत.

ग्रामपंचायतीची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदर तिच्या हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाही. नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याच्या कार्यवाहीस तत्काळ सुरुवात करावी लागणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. तहसीलदारांनी गुगल अर्थ नकाशे करून प्रत्येक गावात दि. 20 फेब्रुवारीला नकाशे अंतिम करायचे आहेत. त्यानंतर संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे ही कार्यवाही 27 फेब्रुवारीपर्यंत करायची आहे.

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी दि. 5 मार्चपर्यंत करून या समितीमध्ये गटविकास अधिकारी व संबंधित मंडल अधिकाऱ्यांचा समावेश असेल. प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी दि. 11 मार्चपर्यंत दाखल केला जाणार आहे. जिल्हाधिकारी संक्षिप्त तपासणी करून त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करून प्रारूप दि. 17 मार्चला राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. त्यानंतर आयोगाकडून आवश्यकता असल्यास प्रस्तावास दुरुस्ती करून त्यास दि. 23 मार्चला मान्यतेसाठी सादर करणार आहेत. त्यानंतर दि. 7 एप्रिलला प्रारूप प्रभाग रचना तहसीलदारांकडून जाहीर करण्यात येणार असून, त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. दि. 13 एप्रिलपर्यंत सूचना व हरकती घेण्याची अंतिम मुदत आहे.

प्राप्त हरकती दि. 16 एप्रिलपर्यंत प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहेत. प्रांताधिकारी दि. 21 एप्रिलला हरकतींवर सुनावणी घेणार आहेत. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी दि. 23 एप्रिलला सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी प्रभाग रचना अंतिम करून ती राज्य निवडणूक आयोगास दि. 28 रोजी सादर करणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली अंतिम प्रभाग रचना दि. 4 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT