सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे व डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांना शेकले आहे. आता कोल्हापूर खंडपीठाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा एसपींना याबाबतचे निर्देश दिले असून पीडित मुलीला तत्काळ मानसोपचार तज्ज्ञ देऊन वैद्यकीय खर्च आरोग्य विभागाने खर्च करावा, असेही म्हटले आहे.
कर्नाटक राज्यातील अल्पवयीन मुलीची प्रसूती साताऱ्यात झाल्यानंतर नवजात बाळाचा काही तासांतच मृत्यू झाला. यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर खंडपीठात याप्रकरणी याचिका दाखल केली. यानंतर सातारा सिव्हिल रुग्णालयाने त्यांचे म्हणणे सादर केले. दोन्ही बाजू पाहिल्यानंतर कोल्हापूर खंडपीठाने सातारा सिव्हिल सर्जन डॉ. युवराज करपे व डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांच्यावर ताशेरे ओढले. आरोग्य विभागाने तत्काळ दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले.
कोल्हापूर खंडपीठात दाखल याचिकेची सुनावणी सुरू असून 2 एप्रिल रोजी न्यायालयाने एक ऑर्डर केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, सातारा पोलिसांनी तत्काळ अर्भक मृत्यूप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी. पीडित मुलीला मोफत कायदेशीर सल्ला दिला जावा. तिला वैद्यकीय उपचार देऊन तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जावे. मुलीसाठी वैद्यकीय होणारा खर्च आरोग्य विभागाने करावा. दरम्यान, या केसची पुढील सुनावणी आता 7 एप्रिल रोजी होणार आहे.