Satara infant death Pudhari
सातारा

Satara infant death: अर्भक मृत्यू प्रकरणाने खळबळ

आरोग्य मंत्र्यांकडून त्रिसदस्यीय समिती : जिल्हा शल्य चिकित्सकांसह अधिकाऱ्यांची चौकशी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्भक मृत्यूचे सत्र सुरू असल्याचे आरोप होऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रसूती प्रकरणानेही नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात मेडिकल बोर्डाने मुलीची प्रसूती करण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार सातारा जिल्हा रुग्णालयात ही प्रसूती झाली. मात्र, यादरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप अर्भकाच्या कुटुंबीयांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाची दखल आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी घेतली असून सातारचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण गाजत आहे. रुग्णालय प्रशासन व मुलीचे नातेवाईक वेगवेगळ्या बाजू मांडत असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील एका घटनेची दखल घेत त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह संबंधितांवर वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू झाली आहे.

दरम्यान, याप्रकरणाची महिला बाल विकास विभागाने गंभीर दखल घेऊन त्यांच्या वतीने कोल्हापूर खंडपीठात हे प्रकरण नेण्यात आले. विजापूर (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. प्रकृती बिघडल्याने ती 9 मार्च रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. मुलगी अल्पवयीन व अविवाहित असल्यामुळे सुरुवातीला गर्भपातास कायदेशीर कारणास्तव नकार देण्यात आला. नंतर नातेवाईकांनी मेडिकल बोर्डात दाद मागितली. त्यानुसार बोर्डाने प्रसूतीला परवानगी दिली. गर्भाचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा अधिक असल्याने गर्भपाताऐवजी प्रसूती करण्याचा निर्णय देण्यात आला होता.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांनी ही प्रसूती केली. मात्र, अकाली प्रसूती झाल्याने अर्भकाचे वजन केवळ 750 ग्रॅम होते. प्रसूतीनंतर योग्य ती काळजी न घेतल्याचा आरोप संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी केला. बाळाला 12 तास उपाशी ठेवण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी नातेवाईकांच्या वतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात महिला व बालविकास विभागामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. याची दखल घेत ना. प्रकाश अबिटकर यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाच्या या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती त्यांनी नेमली आहे. या समितीकडून काम सुरू करण्यात आले असून सिव्हिल सर्जन डॉ. युवराज करपे यांच्यासह संबंधितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT