सातारा : दिल्लीत नीट परीक्षा अन् पेपरफुटीविरोधात सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची धग जिल्ह्यापर्यंत पोहचली आहे. समाजमनातून तीव्र पडसाद उमटूले असून विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरु लागले आहेत. संविधान, पुस्तके घेवून झेनझी रॅली काढून शिक्षण व्यवस्था, परीक्षा आयोजक यंत्रणांचा निषेध करत आहेत.
जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना या झेनझीना खंबीर पाठिंबा देत आहेत. संविधानिक मार्गाने शांतेत आपले म्हणणे मांडणार्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेण्याची गरज होती. मात्र तसे न होता आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नामुळे हिंसक वळण लागल्याने संपूर्ण व्यवस्थेबाबतच तीव्र संंताप व्यक्त करण्यात येत आहे.
पेरपफुटीमुळे शैक्षणिक नुकसान झालेच आहे पण मानसिक स्वास्थ्य हिरवले गेले आहे. प्रचंड मेहनत घेवून नीट परीक्षेचा अभ्यास केला. परीक्षेनंतर कळते की ही परीक्षाच रद्द करुन पुन्हा परीक्षा होणार आहे, हा निर्णय हादरवणारा होता. पेपर फुटीची घटना विद्यार्थ्यांचे शैक्षणिकच नाही तर अवघे जीवन उद्ध्वस्त करु शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा घटनांनी न खचता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. शैक्षणिक भविष्यासाठी दिल्लीत लढणारे आंदोलक हे अवघ्या तरुणाईचे प्रतीनिधीत्व करत आहेत.-अर्थव बागल, विद्यार्थी, प्रतिनिधी
पहिल्यांदा पेपर फुटला. दुसर्यांदा नीट परीक्षा घेवून निकालाच्या गुणपत्रकातील गुणांमध्ये एका रात्रीत फेरफार ही पेपर फुटीपेक्षाही गंभीर गोष्ट आहे. याबाबत कोणतीच यंत्रणा दखल घेत नसल्याने दाद तरी कोणाकडे मागायची? दिवसरात्र अभ्यास करणार्या मुलांची मेहनत पाण्यात गेल्याने ती डिप्रेशनमध्ये जातात. त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येत आहे. अशा गोष्टींना वेळीच आळा बसलानाही तर विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडेल. शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड पोकरत आहे. त्याविरोधातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्न सुरु आहे.-डॉ. स्नेहांजली महामुनी, पालक प्रतिनिधी
दिल्लीत शांततेच्या मार्गाने होणार्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तरुणाईमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशापासूनच स्पर्धेला तोंड द्यावे लागते. नीटसारख्या संवेदनशील परीक्षेत विद्यार्थी अनेक वर्षे कष्ट घेतात. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर या विद्यार्थ्यांना सहकार्य अपेक्षित आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे व पर्यायाने देशाचे भविष्य धोक्यात येत आहे. संवेदनशील विषय योग्य पध्दतीने हाताळणे आवश्यक आहे. गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी यंत्रणेने योग्य प्रतिसाद देत आंदोलकांशी चर्चा करणे अपेक्षीत आहे.-सुरेश साळुंखे, प्राचार्य, वायसी कॉलेज, सातारा.