महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक ब्रिजभूषण जयसिंग सिंग यांची सायबर चोरट्यांनी गुगल पे यूपीआय ॲपद्वारे ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. गुगल अपडेटच्या नावाने आलेल्या संदेशानंतर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रिजभूषण सिंग यांना दि. २७ ऑक्टोबर रोजी मोबाईलवर गुगल अपडेटच्या नावाने संदेश आला होता. त्यानुसार अपडेट केल्यानंतर त्यांच्या गुगल पे खात्यातून शिवम कुमार याच्या नावावर ३० हजार, नीर फिदा याच्या नावावर ३० हजार, तर मोहम्मद उणेस याच्या नावावर २० हजार आणि पाच हजार रुपये, अशी ८५ हजार रुपयांची रक्कम परस्पर वळती झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सायबर चोरट्यांनी आणखी काही व्यवहार करण्याचाही प्रयत्न केला होता.
अफरीदी आलेम, आयुष कुमार सोनकर आणि समीर मुर्मू यांच्या नावाने ३२ हजार १३५ रुपये काढण्याचा प्रयत्न झाला. तसेच डोवारी ज्योती रत्न प्रदीप या नावाने तीन वेळा प्रत्येकी ३० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे व्यवहार अयशस्वी ठरले.