सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तब्बल 33 वर्षांनंतर साताऱ्यात साहित्यिकांचा आनंदमेळा जमणार असल्याने सातारकरही हा साहित्याचा भव्यदिव्य सोहळा अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत.
शतकपूर्व संमेलन अनेक नवनवीन संकल्पना घेवून पुढे येत आहे. नव्या रितीरिवाजांचे पायंडेही पाडत आहे. संमेलन सर्वोत्तम व्हावे याकरिता आयोजकांसह साताऱ्यातील प्रत्येक नागरिक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. साताऱ्यातील वैशिष्ट्यपूर्ण चवीचे सुग्रास भोजन साहित्यिकांचे रसनारंजन करणार आहे तर विशेष निमंत्रित साहित्यिकांची खास बडदास्त ठेवण्यात येणार असून त्यांना चांदीच्या ताटात भोजन देऊन मराठ्यांच्या राजधानीत त्यांचे प्रेमाने कौडकौतुक केले जाणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून, दि. 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत शाहू स्टेडियम येथे ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेमलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिमाखदार ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाच्या सोहळ्याला गुरुवारी (दि. 1) प्रारंभ होणार आहे.
हे साहित्य संमेलन शहराच्या सांस्कृतिक जीवनाला नवी ऊर्जा देणारे आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्यासह त्यांची संपूर्ण टिम झटत आहे. गुरूवारी पहिल्या दिवशी ध्वजारोहण, ग्रंथप्रदर्शन, कविकट्टा, गझलकट्टा, प्रकाशन कट्टा यांचे उदघाटन तसेच ग्रंथदिंडी, ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान, बहुरुपी भारुड असा भरगच्च कार्यक्रम पार पडल्यानंतर या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.