सातारा : सैनिकांचा जिल्हा म्हणून देशभर ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची मात्र रुग्णसेवेअभावी होरपळ होताना पहायला मिळत आहे. येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये केवळ एका डॉक्टरला रोज तीनशे रुग्णांवर उपचार करावे लागत असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुग्णसेवेचा बट्ट्याबोळ होताना पहायला मिळत आहे.
सदरबझार येथे सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्मी हॉस्पिटल आहे. मात्र, रुग्णालयाचा दर्जा हा ‘क’ वर्गात आहे. त्याची दर्जाउन्नती करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. सध्या देशसेवेत असलेले व निवृत्त झालेले सैनिक तसेच त्यांचे कुटुंबीय असे मिळून जिल्ह्यातील 30 हजार लोक आरोग्याच्या समस्येसाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत.
शिरवळपासून कासेगावपर्यंत आणि फलटण-माणपासून पांगारी खोर्यापर्यंत विस्तारलेल्या सातारा जिल्ह्यातील सैनिक सीमेवर कडा पहारा देत असले तरी त्यांच्या कुटुंबीयांची मात्र रुग्णालयातील उपचारांअभावी होरपळ होत आहे. या रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टरची नियुक्ती नाही. जे डॉक्टर निवडले जातात, ते कंत्राटी पध्दतीने घेतले जातात. दोन वर्षांचे कंत्राट संपले की डॉक्टर निघून जातात. याउलट खासगी हॉस्पिटलमध्ये एमडी, एमबीबीएस डॉक्टरांना चांगले पगार मिळतात. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये व्हिजिट करुन हे डॉक्टर पैसे कमावू शकतात. मात्र, आर्मी हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना सेवा बजवावी लागते.
तसेच रोजच्या रोज किमान 300 रुग्णांची तपासणी करावी लागते. एक डॉक्टर रोज हे दिव्य रोज पार पाडतो. मात्र, त्यामुळे रुग्णांना रखडत थांबावे लागते. दूरवरुन एसटीने प्रवास करुन आलेल्या रुग्णांची हेळसांड होते. या रुग्णालयात रखडत बसण्यापेक्षा रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये जाऊन उपचार करुन घेऊ लागले आहे. आर्मीच्या लोकांसाठी रुग्णालयाची सुविधा असूनही त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याची ना लोकप्रतिनिधींना चिंता आहे ना आर्मीला. डिफेन्स विभागाने यावर लवकर तोडगा काढावा, डॉक्टरांची उपलब्धता करावी, अशी मागणी रुग्ण करत आहेत.
रुग्णालयात रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या जागांसाठी नुकत्याच मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. 15 ऑगस्टपर्यंत तज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील. त्यानंतर रुग्णांची गैरसोय थांबेल.-शंकर माळवदे, माजी नौसैनिक, सदस्य, इसीएसएच आर्मी रुग्णालय
मेडीकल ऑफीसरला 1 लाख 30 हजार रुपये आणि मेडिकल स्पेशालिस्ट डॉक्टरला 95 हजार रुपये इतका पगार देऊनही एमडी, एमबीबीएस डॉक्टर मिळत नसतील तर बीएएमएस, बीएचएमएस पदवीधर डॉक्टरांची नेमणूक याठिकाणी केली तर रुग्णांची होणारी होरपळ थांबेल. याबाबत डिफेन्स विभागाने निर्णय घेण्याची मागणी रुग्ण करत आहेत.