Honey Trap Pudhari
सातारा

Satara Honey Trap Cases : सावधान! ‘बिलंदर’ बायका, शोधताहेत ‘कलंदर’ सावज

हनी ट्रॅपच्या जाळ्यात साताऱ्यातील सेलिब्रेटी : लाडीवाळ बोलणं, हळूवार मैत्री आणि अब्रूला कात्री

पुढारी वृत्तसेवा
विठ्ठल हेंद्रे

सातारा : फोनवर आलेला राँग नंबर… दोन-चार दिवस गोड व लाडीवाळ बोलणं… हळूवार मैत्री, मग प्रेमाच्या आणाभाका… विश्वास बसला की भेटीगाठी… आणि त्यानंतर अचानक पैशांची मागणी, बदनामीची धमकी अन् ब्लॅकमेलिंग! वरवर प्रेमाचा गोडवा वाटणारा हा प्रकार साताऱ्यातील मान्यवर प्रतिष्ठितांच्या, सेलिब्रेटींच्‍या घरात संशयाचे वादळ उठवत आहे.

नखरेल संवादाने घायाळ करणाऱ्या ललना पुढे जावून प्रतिष्ठितांच्या अब्रूचे खोबरे करत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. हनी ट्रॅपच्या मोहजाळ्यात अडकवून आर्थिक लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत आहेत. बँडबाजा व्यावसायिकापासून डॉक्टर आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींपर्यंत हनी ट्रॅपच्या या खेळाने धास्ती निर्माण केली आहे. त्‍यामुळे सावधान! अशा बिलंदर बायका कलंदर सावजांच्‍या शोधात आहेत त्‍यांची शिकार होवू नका.

सुरुवातीला ओळख नसते, संशयही नसतो. समोरून आलेल्या फोनला उत्तर दिले जाते. बोलता-बोलता समोरची व्यक्ती आपलीच असल्याचा भास निर्माण करते. काळजी, प्रेम, आपुलकी अन् भावनिक आधाराच्या गप्पांतून विश्वास संपादन केला जातो. मात्र, या विश्वासा-मागे काही वेगळाच डाव असेल, तर समोरच्या व्यक्तीला कळेपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. प्रतिष्ठा जपायची की पोलिसांकडे जायचे, अशा द्विधा मनःस्थितीत अनेकजण अडकतात.

हनी ट्रॅप म्हणजे नेमके काय?

हनी ट्रॅप म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रेम, आकर्षण, मैत्री, भावनिक जवळीक अथवा लैंगिक संबंधांचे आमिष दाखवून फसवणे आणि नंतर त्याचा गैरफायदा घेऊन पैसा, माहिती अथवा अन्य लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणे. यामध्ये प्रत्येक वेळी प्रत्यक्ष भेट होईलच असे नाही. सोशल मीडिया, फोन, मेसेजिंग अप्स, व्हिडिओ कॉल, डेटिंग अप्स अथवा प्रत्यक्ष ओळखीच्या माध्यमातूनही व्यक्तीला जाळ्यात ओढले जाऊ शकते. एकदा विश्वास संपादन केला की खासगी माहिती, संवाद, फोटो अथवा व्हिडिओचा गैरवापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

पेशंट म्हणून आली अन्‌ डॉक्टरलाच ‘सलाईन’ लावून गेली

साताऱ्यातील एका घटनेत डॉक्टरांना लक्ष्य करण्यात आले होते. पेशंट म्हणून संपर्कात आलेल्या महिलेने डॉक्टरांशी ओळख वाढवली. उपचारांच्या निमित्ताने सुरू झालेला संवाद पुढे मैत्रीत, त्यानंतर भावनिक नात्यात बदलला. डॉक्टरही या नात्यात प्रेमरोगी झाले. मात्र, नात्याचा गोडवा संपून पैशांच्या मागणीचा सिलसिला सुरू झाल्याचा आरोप आहे. आर्थिक मागणी, दबाव आणि बदनामीची भीती यामुळे डॉक्टरांची घालमेल वाढली. प्रतिष्ठा आणि कुटुंबाच्या विचाराने मानसिक ताण वाढत गेला. अखेर डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा कथित प्रकार समोर आला.

‘झंगाट’ मागे लावणार्‍या टोळधाडी सातार्‍यात

सातार्‍यात चक्‍क शिवसेनेच्‍या जिल्‍हा प्रमुखालाच तीन जणींनी घायाळ करुन टाकले. शिवसेनेच्‍या या दादांनी अनेक आंदोलने केली, अनेकांना हिसके दाखवले, पक्षासाठी जिल्‍हाभर मोहिमासुद्धा ते काढणार होते. पण त्‍यांच्‍याच मागे हे लटांबर लागले त्‍यामुळे मोहीमा थंडावल्‍या म्‍हणे. पण या दादांना या तिघींनी घायकुतीला आणले असेल तर दादांच्‍या आधी खंडणीसाठी किती जणांचे नंबर लागले असतील याचा शोध पोलिस घेणार का? अशा कितीतरी टोळधाडी सातार्‍यात आहेत त्‍याचा पोलिस कधी शोध घेणार आहेत की नाही? ब्‍लॅकमेलिंग करणार्‍या, हनी ट्रॅप लावणार्‍या अशा बिलंदर बायकांना पोलिस कडक शिक्षा देणार आहेत की नाही?

सातार्‍यात राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक उच्‍चभ्रूंचा वावर आहे. अशा व्‍यक्‍तींच्‍या व्‍हॉटसअप, इन्‍स्‍टा, फेसबुक, मेसेंजरमध्‍ये घुसून त्‍यांच्‍याशी लगट वाढवून, त्‍यांना कार्यक्रमांना बोलावून, त्‍यांच्‍या कार्यक्रमांना न बोलावता जावून, त्‍यांची अवाजवी स्‍तुती करुन जवळीक साधण्‍याचे फंडे सध्‍या राबवले जात आहेत. यामध्‍ये काही ‘म्‍होरक्‍या’ स्‍त्रियाही ‘तू आमक्‍याची वाजव’, ‘तमक्‍याची वाजव’ अशा सुपार्‍या देत आपले टिपर प्रतिष्‍ठितांच्‍या अंगावर सोडत आहेत. समाजामध्‍ये चांगले काम करणार्‍या व्‍यक्‍तींची नाहक बदनामी करणारी कुजबुज महिलांच्‍या वर्तुळात करुन अशा व्‍यक्‍तींच्‍या सानिध्‍यात भानगडबाज महिलांना सोडण्‍याची कंत्राटेही सातार्‍यात घेतली जात आहेत. महिला संघटनांच्‍या प्रमुखांनीही अशा प्रकारांवर आक्षेप नोंदवले आहेत. कधी कधी कार्यक्रमांच्‍या नावाखाली सुरु झालेल्‍या पेज थ्री पार्ट्या अशा गैरप्रकारांना खतपाणी घालू लागल्‍या आहेत. अशा पार्ट्यामध्‍ये प्रतिष्‍ठितांची नावे सहजपणे सुचवून त्‍यांच्‍या मागे झंगाट कसे लागेल? याची व्‍यवस्‍था केली जात आहे. त्‍यामुळे सातारकरांनी अशा बिलंदरांना बळी पडून दलिंदर होणे टाळावे.

महामार्गावर लिफ्ट देताना घ्या काळजी

प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींकडून लिफ्ट मागणे, मदतीचे आवाहन करणे किंवा वाहन थांबवण्याच्या निमित्ताने संपर्क साधणे, अशा परिस्थितीत चालकांनी सावध राहणे गरजेचे आहे. महामार्गावरील प्रत्येक लिफ्ट मागणारी व्यक्ती संशयित नसते; मात्र निर्जन ठिकाणी वाहन थांबवणे, अनोळखी व्यक्तीच्या आग्रहावरून मार्ग बदलणे अथवा स्वतःची माहिती देणे याबाबत सतर्कता आवश्यक आहे. प्रवासाची माहिती कुटुंबीयांना देणे, सुरक्षित व गर्दीच्या ठिकाणी थांबणे आणि संशयास्पद परिस्थितीत पोलिसांची मदत घेणे ही खबरदारी महत्त्वाची ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT