सातारा : साताऱ्यातील राधिका चौक परिसरात अनोळखी पुरुषाचा थंडीने मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. ही घटना दि. 20 नोव्हेंबर रोजी घडली आहे. दरम्यान, मृत व्यक्ती फिरस्ती असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, थंडीच्या कडाक्यामुळे फिरस्ते असणाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यासाठी उपाययोजना होण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. राधिका चौक परिसरात फिरस्ती व्यक्ती निपचित पडला असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती रुग्णवाहिकेला समजल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला उपचारासाठी सिव्हिलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मात्र त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. फिरस्ती असणारे व्यक्ती यामध्ये प्रामुख्याने वृध्द महिला, पुरुष यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर फिरल्यानंतर रात्री ते उघड्यावर झोपत असतात. सांयकाळपासून थंडी सुरु झाल्यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत हुडहुडी राहत आहे. अशा परिस्थितीला सामोरे जाताना बेघर असणाऱ्यांना अडचणीचे होत आहे. यासाठी सामाजिक संस्थांनी जुने कापडे घेवून ती गरजू लोकांना देण्याची चळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.