Satara News: महामार्गाची कामे कासव गतीने; रुंदीकरण ठरतेय जीवघेणे  Pudhari Photo
सातारा

Satara News: महामार्गाची कामे कासव गतीने; रुंदीकरण ठरतेय जीवघेणे

अनेक ठिकाणी मृत्यूचे सापळे : ठेकेदार-अधिकाऱ्यांचे साटेलोटे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक, प्रवासी हैराण झाले आहेत. ‌‘रोजचेच मढे, त्याला कोण रडे‌’ अशी अवस्था या महामार्गाच्या कामाबाबत आहे. सातारा - पुणे महामार्गाच्या कामाचे रडगाणे सुरू असतानाच आता शेंद्रे ते कागल या रस्त्याच्या सहापदरीकरण कामाची गतीही मुंगीच्या वेगाने आहे. या परिस्थितीत जागोजागी वळवलेले रस्ते, मोठ्या पुलांच्या ठिकाणी असलेली धोकादायक स्थिती ‌‘जैसे थे‌’ असल्यामुळे ही कामे जीवघेणी बनली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच संबंधित ठेकेदाराचे व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे कान टोचावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधून होत आहेत.

पुणे-बंगळूर महामार्गावरील कामांबाबत तसेच ठिकठिकाणी होणाऱ्या अपघातांबाबत राज्यातील खासदार, आमदार, मंत्री कायमच प्रश्न उपस्थित करत आले आहेत. सातारा, कराड, कोल्हापूर या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांची बैठक घेऊन सूचना केल्या जात असल्या, तरी गेंड्याची कातडी पांघरलेले ठेकेदार आणि त्यांच्या सुरात सूर मिसळणारे प्रशासकीय अधिकारी यांची अभद्र युती सर्वसामान्य प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. दरम्यान, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ना. हसन मुश्रीफ यांनी वारंवार बैठका घेऊन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खा. सुप्रिया सुळे यांनी महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत व महामार्गावरील कामे कधी पूर्ण होणार? याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खंबाटकीमधील दोनपैकी एक बोगदा लवकरच सुरु करण्यात येणार असून या रस्त्याचा 6 हजार कोटी रुपयांचा डिपीआर शासनाने बनवला आहे. महामार्गावरील अडचणींबाबत येत्या आठवड्यात बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा - पुणे दरम्यानची अवस्थाही बिकट आहे. वाहतूक कोंडी व रोजचे अपघात अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. त्याचबरोबर पेठनाका ते कागलपर्यंतचा मार्गही मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गाच्या 61 किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला ऑक्टोबर 2022 मध्ये सुरुवात झाली. यासाठी 2111 कोटींचा खर्च येणार आहे. जुलै 2025 पर्यंत प्रत्यक्षात 45 टक्केच काम झाले आहे. 40 टक्के रक्कम ठेकेदार कंपनीस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम 30 एप्रिल 2026 अखेर पूर्ण करण्याची मुदत आहे. दुसऱ्या टप्प्यात पेठनाका ते साताऱ्यापर्यंत 67 किलोमीटरचे काम केले जात आहे. यासाठी 2330 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाला मे 2022 मध्ये सुरुवात झाली. 31 मार्च 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. जुलै अखेरपर्यंत प्रत्यक्षातील काम 70.24 टक्के झाले आहे. कामाची आर्थिक प्रगती 75.96 टक्के झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT