सातारा

Satara News : महामार्गावरील खड्डा अपघाताचा अड्डा

महामार्ग प्राधीकरण, ठेकेदाराच्या नावाने बोंबाबोंब

पुढारी वृत्तसेवा
प्रवीण माळी

तासवडे टोलनाका : शेंद्रे ते कागल महामार्गावर कराड तालुक्यातील खोडशी ते वनवासमाची दरम्यान रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सिमेंटच्या महामार्गावर मोठ्ठा खड्डा खणण्याचा उद्योग केला आहे . मोठ्या खड्ड्यामुळे या ठिकाणी रोजच अपघातांची मालिका सुरू असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महामार्ग प्राधिकरण विभागाने व ठेकेदाराने राष्ट्रीय महामार्गाच्या नियमावलीलाच हरताळ फासण्याचे काम केले आहे.यामुळे वाहनचालक व स्थानिक महामार्गप्राधिकरण व ठेकेदाराचे नावाने बोंबाबोंब करत आहेत.

2022 पासून शेंद्रे ते कागल या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. प्रथम डीपी जैन या कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम घेतले होते .त्यानंतर सदरचे काम डी पी जैन कंपनीकडून काढून घेतल्यानंतर परिसरातील अनेक स्थानिक ठेकेदारांना देण्यात आले आहे . गेल्या चार वर्षापासून काम सुरू आहे मात्र कामाचा दर्जा अतिशय सुमार आहे .काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी नवीन केलेले रस्ते ,नाले तसेच सेवा रस्तेही उखडल्याचे प्रकार घडले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाच्या नियमावलीला हरताळ फासून ठेकेदारांच्याकडून रात्रंदिवस काम सुरू आहे. सदरचे काम अतिशय हिन दर्जाचे होत आहे .तरीही या कामांकडे महामार्ग प्राधिकरणाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नाही की जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे का ? असा आरोप वाहनचालक आणि स्थानिक करत आहेत. महामार्गाचे काम सुरू असताना मनमानी पद्धतीने महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येते .यावेळी स्थानिकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. तसेच अनेक ठिकाणी सेवारस्ते दहा फुटापेक्षा उंच आहेत .त्यामुळे महामार्गाच्या लगतचा शेतकरी पूर्णपणे भरडून गेला असून शेतातील कोणतेही कामे करताना फार मोठे अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान कराड तालुक्यातील खोडशी आणि वनवासमाची या दरम्यान पूर्व बाजूच्या महामार्गावर गेल्या दोन वर्षापासून सिमेंटच्या रोडवर डांबराचा भरावा टाकण्यात आला होता. यावरून कशीतरी वाहतूक सुरू होती .त्यावेळीही या ठिकाणी अनेक अपघात झाले आहे .परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी ठेकेदाराकडून या ठिकाणी असलेले डांबर काढण्यात आले आहे .आणि त्या ठिकाणी दोन ते तीन फुटाचा खड्डा उकरून ठेवला आहे.

खड्ड्यालगत सिमेंटचे बॅरिकेट लावले आहेत .परंतु हे बॅरिकेट रात्रीच्या सुमारास अनेक वाहन चालकांना दिसून येत नाहीत. तर दिवसा ट्रक कंटेनर यासारख्या वाहनांच्या गर्दीमुळे दुचाकी , चारचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करत आपले वाहन चालवावे लागते. हा प्रकार गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे तरीही महामार्ग प्राधिकरणाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला हे का दिसत नाही ? असा प्रश्न स्थानिक विचारत आहे. यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून त्यांच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT