लिंब : पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी ते लिंबखिंड दरम्यान थरार अनुभवयाला मिळाला. इनोव्हा कारला झाशा देऊन पुढे निघालेल्या कारला आनेवाडी टोलनाक्यावर अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला चालकाने सीटबेल्टच्या सहाय्याने तब्बल तीन किलोमीटर लिंबखिंडीपर्यंत फरफटत नेेल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने लिंबखिंड परिसरात जीपच्या काचा फोडून चालकासह दोघांना मारहाण केली. यावेळी वाहनांच्या रांगा लागून महामार्ग ब्लॉक झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत दोघांना जमावाच्या तावडीतून वाचवल्याने मोठा अनर्थ टळला.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या इनोव्हा कारला (एमएच १२ जीझेड १९४६) पाठीमागून आलेली कार (एमएच १२ आरएफ ९९०१) झाशा देवून पुढे निघून गेली. इनोव्हा कारमधील व्यक्तींनी कारला थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने गाडी न थांबविता वेगाने पुढे नेली. इनोव्हामधील व्यक्तींनी आनेवाडी येथील मित्र उमेश फरांदे यांना फोन करून टोलनाक्यावरून जाणाऱ्या कारला अडविण्याची विनंती केली. त्यानुसार फरांदे यांनी आनेवाडी टोलनाक्यावर कार अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जीपचालकाने आरेरावी करत सीटबेल्ट फरांदे यांच्या गळ्यात अडकवला आणि गाडी पुढे दामटली.
फरांदे यांनी पाय कारमध्ये ठेवून अर्धवट उघडलेल्या दरवाजाला एका हाताने घट्ट पकडले. मात्र तरीही चालक कार दामटवत निघाला होता. फरांदे यांनी गाडी थांबविण्यासाठी चालकाकडे गयावया केली. मात्र, चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत ‘माझी गाडी अडवतोस, तुला बघतोच,’ अशी धमकी दिल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्याने फरांदे यांना सीटबेल्टने ओढत टोलनाक्यापासून लिंबखिंडीच्या दिशेने नेले. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू होता. अखेर प्रसंगावधान राखत फरांदे यांनी चालत्या कारमध्ये उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला.
दरम्यान, इनोव्हा चालकाने जीपचा पाठलाग करत वेग वाढविला आणि लिंबखिंड परिसरात महामार्गावर या कारला आडवी गाडी लावून थांबविले. हा संपूर्ण प्रकार महामार्गावरील अन्य वाहनचालकांनी पाहिल्याने काही वेळातच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला. जमावाने कारमधील दोघांना बाहेर येण्यास सांगितले. मात्र, जमाव आक्रमक झाल्याचे पाहून कारमधील कुरण महनपती व संतोष गोपाल बसवेश्वराय (रा. पुणे) हे गाडीतच थांबले. संतप्त जमावाने कारच्या चारही बाजूंच्या काचा दगड मारून फोडल्या. तसेच मोठमोठे दगड गाडीवर फेकून वाहनाचे मोठे नुकसान केले. त्यानंतर काचा फोडून दोघांनाही मारहाण करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिस ठाण्याचे महामार्ग पोलिस सुशांत धुमाळ, सातारा तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन घोरपडे, सूरज रेळेकर, उमेश बगाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न करत कारला घेराव घातला आणि गाडीतील दोघांना जमावाच्या तावडीतून वाचवले. पोलिसांनी दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढून पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलविले. कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.