सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा येथे अजंठा चौकातील उड्डाणपुलाला शुक्रवारी अचानकपणे भगदाड पडले. या प्रकारामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाचे पोस्टमार्टमच झाल्याचे पहायला मिळत आहे.
सातारा येथून रहिमतपूरकडे जाणारा रस्ता येथील अजंठा चौकातून पुढे जातो. याच ठिकाणी महामार्गाचा उड्डाणपूल आहे. शुक्रवारी येथील वाहतूक सुरू असतना उड्डाणपुलाच्या स्लॅबचे तुकडे अचानकपणे खाली कोसळले. पुलाला ठिकठिकाणी भगदाड पडले. स्लॅबमधील तारा उघड्या पडल्या तर स्लॅबचा ढिग खालच्या रस्त्यावर पडला. यावेळी स्लॅबच्या खाली वाहन नसल्याने मोठे नुकसान टळले.
पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना राबवत पुलाखालून सातार्याकडे येणारा रस्ता तत्काळ बंद केला. देगाव, रहिमतपूरकडे जाणारी वाहतूक दुसर्या लेनवरुन सुरु ठेवण्यात आली होती. स्लॅब कोसळला असला तरी महामार्गावरील वाहतूक सुरु होती. उड्डाणपुलाच्या रस्त्याला कराडकडून पुण्याच्या दिशेने जाणार्या लेनवर मोठाले डबरे पडले आहेत. या डबर्यामधून उड्डाणपुलाच्या खालचा रस्ता दिसत असून खालून वर पाहिले तर आकाश दिसत आहे. सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाही तर मोठा अनर्थ घडू शकतो.