लिंब : दिवाळीची सुट्टी संपताच चाकरमान्यांची परतीची लगबग सुरू झाली असून, पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांचा महापूर उसळला आहे. पुणे, मुंबई, ठाणे आणि उपनगरांकडे परतणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावरील वाहतूक कमालीची वाढली आहे.
आनेवाडी टोलनाक्यावर शनिवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. टोलनाक्यापासून पुलापर्यंत सुमारे एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने आनेवाडी टोलनाका वाहनांच्या गर्दीने गुदमरून गेला होता.
सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातील अनेक नागरिक रोजगार आणि नोकरीनिमित्त पुणे, मुंबई, ठाणे परिसरात वास्तव्यास आहेत. दिवाळीनिमित्त हे चाकरमानी कुटुंबीयांसह गावी आले होते. सणासुदीचा आनंद लुटल्यानंतर आता सुट्ट्या संपल्याने सर्वांचीच कामाच्या ठिकाणी परतण्याची घाई सुरू झाली आहे. परिणामी, गेल्या दोन दिवसांपासून पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळत आहे.