खेड : पिरवाडी येथील गजानन विश्व गृहनिर्माण सोसायटीमध्ये विजेचा दाब अचानक वाढल्याने नागरिकांची विद्युत उपकरणे जळाली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 12 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत महावितरण कंपनीने चौकशी करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.
पिरवाडी येथील गजानन विश्व गृहनिर्माण सोसायटीमध्ये 45 सदनिकांमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत. सकाळपासून येथील लोकवस्तीमध्ये वीज पुरवठा कमी - जास्त जाणवत होता. काही वेळातच विद्युत भार अचानक वाढल्याने अनेकांचे वीज मीटर जळाले. तर काही नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, संगणक, वॉटर हिटरसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी कृष्णानगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर महावितरणच्या भरारी पथकाने घटनास्थळी येऊन विद्युत रोहित्रांची तपासणी केली असता ट्रान्सफॉर्मरमधील डीओ जळाल्याचे निदर्शनास आले. तेव्हा रहिवाशांनी घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची तक्रार केली. या घटनेला महावितरणची तांत्रिक बेपर्वाई कारणीभूत असल्याचा आरोप रहिवाशांनी करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. दरम्यान, नागरिकांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन नुकसानीबाबत निवेदन देणार असल्याचे सांगितले.