मसूर : हेळगाव (ता. कराड) येथे रस्त्याच्या वाटेच्या वादातून दोन कुटुंबांत झालेल्या वादाला रविवारी (दि. २०) गंभीर स्वरूप आले. या वादातून झालेल्या मारामारीत सूरज भरत सूर्यवंशी (वय २८) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मसूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
ओंकार उत्तम सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी, सुनीता उत्तम सूर्यवंशी, तेजस्विनी संजय सूर्यवंशी व शालन रामचंद्र सूर्यवंशी (सर्व रा. हेळगाव, ता. कराड, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सोमवारी (दि. २१) सर्वांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाचही संशयितांना शनिवार (दि. २६ सप्टेंबर)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, घटनेतील काही जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे उपचार पूर्ण होईपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून घटनेचा नेमका घटनाक्रम, प्रत्येकाची भूमिका आणि उपलब्ध पुरावे याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मसूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात करीत आहेत.