सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. कोयना, वीर, धोम धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोयना व निरा नद्यांची पुन्हा पाणी पातळी वाढू लागली आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पहाटेपर्यंत जोरदार पावसाच्या सरी पडल्या. रविवारी दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिली असली तरी दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर पकडला. रविवार बाजाराचा दिवस असल्याने सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली. रस्त्यावर विक्रीसाठी बसणार्या व्यापार्यासह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत होते. वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सध्या खरीप हंगामातील अगाप पिकांची काढणी ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र अधूनमधून पडणार्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
वीर धरणातून 3 हजार 200 क्युसेक, कोयना 2 हजार 100 व धोम धरणातून 505 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात सातारा 26.8 मि.मी., जावली 25.8 मि.मी., पाटण 7.5 मि.मी., कराड 11.5 मि.मी., कोरेगाव 27.0 मि.मी., खटाव 20.9 मि.मी., माण 43.1 मि.मी., फलटण 24.8 मि.मी., खंडाळा 8.1 मि.मी., वाई 17.7 मि.मी., महाबळेश्वर 30.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.