सातारा : विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने बुधवारी रात्री सातारकरांना चांगलेच झोपले. या पावसाने सर्वांची दाणादाण उडवून दिली. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसाने सखल भागामध्ये पाणी साठले. तर रस्त्यांवरुन ओथंबून पावसाचे पाणी वाहिले.
बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्याआधी हवेत प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि मेघांच्या गडगडामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. पावसापासून वाचण्यासाठी अनेकांनी रस्त्याकडेच्या दुकानांचा आसरा घेतला. खाजगी कार्यालयातील कर्मचारी काम संपवून घरी निघाले असतानाच या पावसाने हजेरी लावल्याने कर्मचारी कार्यालयामध्येच अडकून पडले होते. रात्री बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची ही भलतीच पळापळ झाली. सव्वा नऊच्या सुमारास वीजही गायब झाली. अर्ध्या तासाच्या वर पावसाने जोरदार बॅटिंग करुन दानादान उडवली. या पावसामुळे हवेतील उकाडा गायब झाला.