सातारा

Satara Politics: हातगेघर सोसायटीचा ठराव रद्द झाल्याने तणाव

शशिकांत शिंदेंना राजकारण काय असतं ते दाखवून देऊ ; मानकुमरेंचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : सहा गावांचा समावेश असलेल्या हातगेघर विकास सेवा सोसायटीचा ठराव कोरमअभावी रद्द झाल्यानंतर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी धडक देत संचालकांना मतदानासाठी पाठविण्याची मागणी केली. मात्र संचालक हजर न झाल्याने ठराव रद्द झाला आणि जावलीच्या राजकारणात नवा संघर्ष उभा राहिला.

जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने विकास सेवा सोसायट्यांचे ठराव अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. काही दिवसांपूर्वी आलेवाडी आणि आखाडे सोसायटीच्या ठरावावेळीही दोन गटांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष झाला होता. त्यानंतर बुधवारी हातगेघर सोसायटीच्या ठरावासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावात कलम १४४ लागू केले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ठरावाच्या बैठकीवेळी आवश्यक सहा संचालकांपैकी केवळ दोनच संचालक उपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे ठराव रद्द करण्यात आला. उर्वरित चार संचालकांना शशिकांत शिंदे यांनी आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप वसंतराव मानकुमरे यांनी केला.

ठराव रद्द होताच मानकुमरे समर्थकांसह थेट शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. शिंदे यांच्या पत्नी, मुलगा आणि शेकडो कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. ‘संचालक परत मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही,‘ असा पवित्रा मानकुमरे यांनी घेतला. काही वेळ दोन्ही बाजूंमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगितले जात असले तरी त्या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत, आज आमचा ठराव रोखला गेला असला तरी येणाऱ्या काळात राजकारण काय असते ते दाखवून देऊ, असा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT