pudhari photo
सातारा

Satara: सांगलीपेक्षा साताऱ्याकडे 49 मतदार जादा

जिल्ह्यात एकूण 472 मतदार : आता लक्ष उमेदवारीकडे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदार संघाची निवडणूक जाहीर होताच राजकीय आखाड्यात इच्छुकांची गर्दी उसळू लागली आहे. 25 मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. आता लक्ष उमेदवारीकडे लागून राहिले आहे. मात्र, या निवडणुकीत मतदार संख्येचा विचार करता सांगलीच्या तुलनेत साताऱ्याकडे 49 जादा मते असून सर्वमिळून 472 मतदार या जिल्ह्याकडे आहेत.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था या सांगली-सातारा मतदारसंघात सांगली जिल्ह्याकडे 423 मतदार आहेत, तर सातारा जिल्ह्याकडे तब्बल 472 मतदार आहेत. म्हणजेच साताऱ्याकडे सांगलीच्या तुलनेत तब्बल 49 मतदार अधिक आहेत. विधान परिषदेच्या या प्रकारच्या निवडणुकीत जेथे प्रत्येक मत निर्णायक ठरते, तेथे ही संख्या राजकीयदृष्ट्या अत्यंत मोलाची व महत्त्वपूर्ण आहे. या मतदारसंघात एकूण 895 मतदारांपैकी 52 टक्क्यांहून अधिक मतदार हे सातारा जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे उमेदवार निवडून आणायचा असेल, तर सातारा जिल्ह्याची मते पदरात पाडून घेणे अपरिहार्य आहे, हे सत्य कोणत्याही राजकीय पक्षाला नाकारता येणार नाही.

सातारा जिल्हा हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात एक वजनदार जिल्हा म्हणून ओळखला जातो. छत्रपतींची भूमी असलेल्या या जिल्ह्याने राज्याला अनेक दिग्गज नेते दिले आहेत. जिल्ह्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांचे मजबूत नेटवर्क आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधी असल्याने एकाच पक्षाची मते एकगठ्ठा मिळतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे उमेदवाराची प्रतिमा, जनसंपर्क आणि विश्वासार्हता या बाबीही महत्त्वाच्या ठरणार आहेत.

मतदारसंख्चेचे गणित पाहता, कोणताही प्रमुख पक्षाला उमेदवारी देताना सातारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. सातारा जिल्ह्यातील उमेदवाराला स्थानिक मतदारांची सहानुभूती, आपलेपणा हा नैसर्गिक न्यायाने आपसूक मिळतो. त्याचा परिणाम थेट मतदानावर होतो. त्यामुळे महायुती असो वा महाविकास आघाडी, उमेदवार निश्चित करताना साताऱ्याला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता प्रबळ असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दुसरीकडे सांगली जिल्ह्यातही इच्छुकांची कमी नाही. सांगलीतील अनेक नेत्यांनी या जागेवर दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. मात्र मतदारसंख्येतील तफावत लक्षात घेता, सांगलीतील उमेदवाराला सातारा जिल्ह्यातील मते मिळवणे हे मोठे आव्हान असेल. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होताच दोन्ही जिल्ह्यांतील इच्छुकांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि मतदारांशी जुळवाजुळव या गोष्टी वेगाने सुरू झाल्या आहेत.

विधानपरिषदेच्या या जागेवर विजय मिळवायचा असेल तर साताऱ्याचे मते निर्णायक ठरतील, हे उघड आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा उमेदवार सातारा जिल्ह्याशी जोडलेला असेल, त्या उमेदवाराचे पारडे जड राहील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मतदारसंख्येचे हे गणित लक्षात घेऊनच पक्षांना उमेदवारी निश्चित करावी लागेल, अन्यथा पश्चातापाची वेळ येण्याची शक्यता आहे. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय रणसंग्राम सुरू होईल. या निवडणुकीचा निकाल दोन्ही जिल्ह्यांच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारा असेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT