साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाला नव्याने फोडणी 
सातारा

Satara Politics : साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाला नव्याने फोडणी

नागपंचमीदिवशीच राजकीय धुळवड : महायुतीत जोरदार ‘धुसफुस’

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, अशी मनातील इच्छा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीतच जाहीरपणे व्यक्त केल्याने पालकमंत्री पदाच्या चर्चेला नव्याने फोडणी मिळाली आहे. शिवेंद्रराजेंनी साताऱ्यात ‘पालकमंत्री पदे आता जाहीर झाली आहेत’ असे सांगून या विषयाला ब्रेक दिला, तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘पालकमंत्री पदाचा निर्णय तिघे बसून घेतील’ असे सांगितले. मात्र, नागपंचमीच्या दिवशी साताऱ्यात पालकमंत्री पदावरून जोरदार ‘धुसफुस’ सुरू राहिली.

साताऱ्याचे पालकमंत्री पद भाजपला मिळावे, अशी भाजपमधील काही नेत्यांची इच्छा यापूर्वीही अनेकदा चर्चेत आली होती. मात्र, आता ग्रामविकास मंत्र्यांनीच जाहीर व्यासपीठावरून ना. शिवेंद्रराजेंच्या नावाचा थेट उल्लेख केल्याने या चर्चेला राजकीय वजन प्राप्त झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा महायुतीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

ना. शिवेंद्रराजे भोसले आणि माझ्यात मैत्रिपूर्ण संबंध असून, जिल्ह्याच्या विकासासाठी दोघेही एकत्र काम करत असल्याचे ना. गोरे यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची वाढलेली जवळीकही चर्चेत आहे. अशातच ‘शिवेंद्रराजे साताऱ्याचे पालकमंत्री व्हावेत', ही इच्छा ना. गोरे यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

ना. जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याबाबत शिवेंद्रराजे भोसले यांना विचारले असता, त्यांनीही हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट केले. ना. शिवेंद्रराजे म्‍हणाले, पालकमंत्री पद कुणाला द्यायचे हा विषय इथला (साताऱ्याचा) नाही. तो मुख्‍यमंत्र्यांचा विषय आहे. सगळीकडे आता पालकमंत्री नेमले आहेत. मी आणि ना. जयकुमार गोरे दोघे सोलापुरात एका कार्यक्रमात होतो, ना. गोरे यांच्‍या भाषणात मी साताऱ्याचा पालकमंत्री व्‍हावे, हा विषय झाला. ना. गोरे आणि माझे मैत्रिपूर्ण संबंध असल्‍याने ते तसे बोलले. आम्‍ही दोघे भाजपमध्‍ये आहोत. एकत्रच आहोत. आमचं प्रेम उतू चाललंय असं नाही. मात्र, आमचा एकमेकांवर विश्‍वास आहे. आमदारकीलाही आम्‍ही संघटितपणे काम केले. मुख्‍यमंत्र्यांनी आमच्‍यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्‍या आहेत. आगामी काळात जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीतही आम्‍ही एकत्रितपणे काम करू. निवडणूक लागल्‍यावर पुढची गणिते ठरतील.

ना. शंभूराज देसाई यांना ना. गोरे यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता, ते म्हणाले, ग्रामविकास मंत्री यांचं वक्‍तव्‍य मी ऐकतो, बघतो जरा काय बोललेत ते, शिवेंद्रराजे साताऱ्याचे पालकमंत्री व्‍हावेत, असे ते म्‍हणाले, हे जर सत्‍य असेल तर पालकमंत्रिपद कुणाला द्यायचं, याचा निर्णय मुख्‍यमंत्री आणि दोन्‍ही उपमुख्‍यमंत्र्यांचा आहे, तिघांनी मिळून ज्‍यावेळी निर्णय घेतला, त्‍यावेळी माझ्‍यावर सातारा जिल्‍ह्याची जबाबदारी दिली आहे.

गोरे-शिवेंद्रराजे मैत्रीचा उघड उल्लेख, देसाईंची सावध प्रतिक्रिया आणि पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असल्याचे दोन्ही बाजूंकडून स्पष्ट होणे, या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पालकमंत्री पद बदलण्याची चर्चा अधिकृत पातळीवर नसली, तरी गोरेंच्या एका वक्तव्याने साताऱ्याच्या राजकारणातील जुन्या चर्चेला नव्याने धग दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर भाजप-शिवसेनेतील राजकीय सूर किती चढतात, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT