File Photo
सातारा

Satara: भूजल पातळी खालावली;106 विहिरींचे सर्वेक्षण

बाष्पीभवनाचा वेग वाढला : जावली, कराड, खटाव तालुक्यातील जलसाठ्यात घट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी उष्म्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. जावली, कराड व खटाव तालुक्यातील भूजल पातळीत घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील 106 विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट आधिक गडद होत चालले आहे.

सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असला तरी भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. कडक उन्हाळ्यामुळे सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आजमितीस बहुतेक विहिरी, तलाव, नद्या व धरणांनी तळ गाठला आहे. उपसा वाढल्याने भूजल पातळीही खालावत चालली आहे.

सध्या माण, खटाव अन्य तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांच्या पिण्याचे पाणी व हिरवा चारा यांचा प्रश्न आणगी जटील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे धरणांमधील पाणी आणि जमिनीतील आर्द्रता वेगाने घटत चालली असून टंचाईमागील हेच एक प्रमुख कारण आहे.

दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे या चार टप्प्यात भूजल पातळीचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत निरीक्षण केले जाते. मार्चअखेरच्या पाहणीअंती यंत्रणेच्यावतीने तालुकानिहाय विहीरींचे सर्वेक्षण करण्यात आले. जावली तालुक्यातील एका विहीरीची भूजल पातळी 1.12 मीटरने घटली आहे. कराड मधील 15 विहीरींची 0.22 मीटर तर खटावमधील 17 विहीरींची 0.51 मीटरने घटली आहे. जिल्ह्यातील 106 विहीरींची मार्चमध्ये 5.93 मीटर भूजल पातळी स्थिर होती. तर मागील पाच वर्षाची सरासरी भूजल पातळी 6.20 मीटरवर स्थिर होती.

सातारा जिल्ह्यातील 106 विहीरींचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये 5.93 मीटर भूजल पातळी स्थिर आहे. पाणी टंचाईच्या संकटापासून बचाव करण्यासाठी पाणी जपून वापरावे. मे महिन्यान पुन्हा भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात येईल.
-डॉ. मेघा शिंदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT