वरकुटे-मलवडी : राणंद (ता. माण) येथे जमिनीच्या वादातून सोमवारी रात्री नातवाने आजीच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला. याप्रकरणी नातवाविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, नातवाचा शोध सुरू आहे.
हिराबाई दाजी मोटे (वय 75) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. तर स्वप्निल लालासाहेब मोटे (रा. राणंद, ता. माण) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हिराबाई घरात न आढळल्याने त्यांची मुलगी संगीता खाशाबा कोळेकर यांनी भाऊ दत्तात्रय दाजी मोटे यांना ही माहिती दिली. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता संगीता व त्यांचा मुलगा संतोष हे रानात गेले असता, त्यांना हिराबाई यांचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसला. जमिनीच्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती पोलिसपाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलिसांना दिली. सपोनि दत्तात्रय दराडे पोलिस पथकासह आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. हिराबाई यांच्या मागे दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.