दहिवडी : ‘जिथे इच्छा तिथे मार्ग’ आणि ‘धाडस केल्याशिवाय साध्य नाही’ या म्हणींचा प्रत्यय माण तालुक्यातील कासारवाडी येथे आला आहे. संसारात पूर्णपणे रमलेल्या, लेकराबाळांना वाढवणाऱ्या आणि नातवंडांना शाळेत पाठवणाऱ्या तब्बल 11 महिलांनी आत्मविश्वासाने दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला आणि इतिहास घडवला.
या महिलांमध्ये कासारवाडीच्या सरपंच छाया सस्ते यांनी तर साठाव्या वर्षी दहावीची परीक्षा देत ‘वय फक्त आकड्यांत असते’ हे सिद्ध करून दाखवले. ‘उंबरठा ओलांडला की अर्धी लढाई जिंकलीच’ असे म्हणतात; त्या उंबरठ्यापलीकडे या महिलांनी आज ठाम पाऊल टाकले आहे. डिसेंबर महिन्यात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या कासारवाडीत आल्या होत्या. त्यांनी सहज विचारलेला प्रश्न ‘तुमच्यापैकी किती महिला दहावी पास आहेत?’ काही महिलांनी दहावी न दिल्याचे, तर काहींनी अपयश आल्याचे सांगितले. त्याक्षणी नागराजन यांनी दिलेले आवाहन म्हणजे जणू झोपलेल्या जिद्दीला दिलेले बळ ठरला.
आव्हानातून उगवलेले स्वप्न घेऊन ‘आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य होते’ हे वाक्य प्रत्यक्षात उतरले. यातून सर्वेक्षणात तब्बल 25 विवाहित महिला दहावी पास नसल्याचे स्पष्ट झाले. माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे आणि गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी लेट फी भरून 17 नंबरचा फॉर्म भरून देण्याची व्यवस्था केली. परीक्षा फीपैकी 50 टक्के रक्कम पंचायत समितीच्या सेस फंडातून देण्यात आली, तर उर्वरित रक्कम गावातून लोकसहभागातून जमा करण्यात आली. सरपंच छाया सस्ते यांनी स्वतः 20 हजार रुपयांचे योगदान देत पुढाकार घेतला.
प्रतिज्ञापत्र, पडताळणी, प्रशासनाशी समन्वय ही सर्व प्रक्रिया म्हणजे ‘दगडावरची रेषा नाही, तर लोखंडी पर्वत चढण्यासारखी’ होती. पण प्रशासन आणि ग्रामस्थांनी मिळून हे आव्हान यशस्वीरीत्या पार पाडले. अठरा वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतच्या 11 महिला मराठी पेपरला हजर राहिल्या व नव्या क्रांतीची नांदी महिलांनी पहिला पेपर दिला. यावेळी परीक्षा केंद्रात एक वेगळाच उत्साह होता. काहींची मुलं दहावी देत होती, तर काहींची नातवंडं शाळेत शिकत होती. अशा परिस्थितीत ही ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाला बाजूला ठेवून त्यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले ‘आम्ही आमच्यासाठी शिकतोय!’ आणि बघता बघता पहिला पेपर झाला.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही महिलांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. लोकलाज, संकोच, वय हे सारे अडथळे आम्ही झुगारून दिले. आता आम्ही आत्मविश्वासाने परीक्षा देत आहोत आणि नक्कीच यशस्वी होऊ.-छाया सस्ते, सरपंच