सातारा : सातार्यातील शाहू स्टेडियम बाहेर नाष्टा करत बसलेल्या शासकीय कर्मचार्याला चाकूसारख्या धारदार हत्याराने भोसकल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. संगम नारायण घोळसे (वय ३०, रा. जत्तेवाडी, ता. चंदगड जि. कोल्हापूर, सध्या रा. सातारा) असे जखमीचे नाव असून ते सातार्यातील कृषी विभागातील आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संगम घोळसे हे कृषी विभागात स्टेनोग्राफर आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते सातार्यात रुजू झाले आहेत. स्टेडियम येथे नेहमीप्रमाणे आल्यानंतर नाष्टा करण्यासाठी तेथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी युवक तेथे आला. संगम बेसावध असताना अचानक युवकाने धारदार चाकू काढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. चाकू हल्ल्याच्या घटनेने परिसर हादरून गेला. हल्ला केल्यानंतर युवकाने तेथेच चाकू टाकून पळ काढायचा प्रयत्न केला.
मात्र, परिसरातील नागरिकांनी त्याला रोखले. दुसरीकडे जखमीला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चाकू हल्ल्याची घटना शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.
असुरक्षिततेची भावना...
हल्लेखोर व जखमी एकमेकांना ओळखत नाहीत. त्यांच्यामध्ये कोणताही वाद झालेला नाही. तरीही प्राणघातक हल्ला झाल्याने स्टेडियम हादरून गेले आहे. दररोज त्याठिकाणी लहान मुले, महिला, खेळाडू येत-जात असतात. या हल्ल्यामुळे सर्वांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दोघे एकमेकांना ओळखत नाहीत
पोलिसांनी जखमी व संशयित आरोपीकडे प्राथमिक तपास केला. मात्र, ते दोघेही एकमेकांच्या ओळखीचे नसल्याचे समोर आले. यामुळे संशयिताने हल्ला का केला? असा सवाल उपस्थित झाला आहे. हल्लेखोर पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याने नेमके कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान, हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.