सातारा

Satara: गोलबागेतील कारंजाच्या पाण्याला करंट!

नागरिकांचा जीव धोक्यात : पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील राजवाड्या-जवळील नगरपालिकेच्या गोलबागेत असलेल्या कारंज्यांच्या पाण्यात विद्युत प्रवाह (करंट) येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीव्र उन्हाळ्यात गारव्यासाठी कारंजाजवळ येणाऱ्या नागरिकांना व चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असताना नगरपालिका प्रशाासन मात्र ढिम्म असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

उन्हाच्या काहिलीत दिलासा मिळावा म्हणून अनेक नागरिक, ज्येष्ठ व लहान मुले गोलबागेतील कारंज्याजवळील बाकड्यांवर बसणे पसंत करतात. मात्र या कारंजाच्या पाण्यात करंट येत असल्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे बागेतील गार्ड स्वत: नागरिकांना व लहान मुलांना कारंजाच्या पाण्यापासून दूर राहण्याच्या सुचना करत आहेत. गार्डला हा धोका माहित असताना प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने का पहात नाही, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

नागरिकांनी याबाबत वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी केल्या असून प्रत्येकवेळी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गर्दी असलेल्या या ठिकाणी एखाद्या लहान मुलाने किंवा नागरिकाने पाण्याला स्पर्श केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. पालिका प्रशासनाने तातडीने कारंजाची विद्युत यंत्रणा तपासून दुरूस्त करावी, अन्यथा कारंजे बंद ठेवावे, अशी मागणी जोर धरत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येण्यापेक्षा वेळीच सावध होणे हे शहाणपणाचे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT