सातारा : साताऱ्यातील पोवईनाका येथे सोमवारी दुपारी मोबाईल फोनवरुन बोलत जाणाऱ्या युवतीला एका महिलेने ट्रॅफिक होतंय, बाजूला जावून बोल, असा सल्ला दिला. मात्र, संबंधित युवतीने थेट महिलेच्या कानाखाली मारली. त्यामुळे संबंधित महिलेच्या दोन मुली त्या मुलीला भिडल्या. यातूनच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने पोवई नाका थबकला.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, एक महिला तिच्या दोन मुलींसोबत पायी पोवई नाक्यावर कामानिमित्त निघाली होती. यावेळी एक युवती फोनवर बोलत रस्त्यातून निघाली होती. यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. युवती फोनवर बोलत असल्याने व वाहतुकीस अडथळा होवू लागल्याने महिलेने युवतीला वडीलकीचा सल्ला दिला. याचा युवतीला राग आला. युवतीने महिलेच्या वयाचा विचार न करता कानाखाली लगावली.
आईला मारहाण होत असल्याचे पाहून महिलेच्या दोन्ही मुलींनी आईची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. यातून त्या तिन्ही मुली आपआपसात भिडल्या. पोरींची हाणामारी पाहून पोवई नाक्यावरील नागरिक, वाहन चालक चाट पडले. वाहतूक पोलिसांनी ही बाब पाहिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून मुलींना शांत केले. हा वाद पुढे पोलिस ठाण्यात गेला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.