तासवडे टोलनाका : कराड तालुक्यातील घोणशी गाव गेल्या पन्नास वर्षांपासून शासनाच्या कागदोपत्री हरवले आहे. गावाचे गावठाण मंजूर होऊन सिटी सर्व्हे व्हावा यासाठी ग्रामस्थ पन्नास वर्षांपासून संघर्ष करत आहेत. मात्र प्रशासनाने त्याकडे नेहमीच काना डोळा केला आहे. तसेच ग्रामस्थांना काही भूखंड वाटप करण्यात आले आहेत; मात्र त्याची सनद किंवा आदेश शासन दरबारी कुठेच नाही. यासाठी ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली बेमुदत उपोषणही करण्यात आले, मात्र तत्कालीन तहसीलदार व गटविकास अधिकार्यांनी आंदोलन स्थगित करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देण्यात धन्यता मानली आहे.
1968 ला नवीन ठिकाणी घोणशी गाव स्थापित झाल्यानंतर या ठिकाणी शासनाकडून भूखंड वाटप करण्यात आले. दरम्यान भूखंड वाटप केलेल्याची शासन दरबारी नोंद नाही किंवा त्याची सनद किंवा आदेश नाही. भूखंड विषयी कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याने गेल्या 50 वर्षात या भूखंडावरुन ग्रामस्थांच्यात आपापसात अनेकदा वाद विवाद झाले. 50 वर्षांपासून हा त्रास भूखंड धारकासह त्याची पुढील पिढी भोगत आहे.
गावाचा सिटी सर्व्हे व्हावा यासाठी घोणशी ग्रामस्थांनी अनेकदा शासन दरबारी खेटे घातले. परंतु शासनाने 50 वर्षांत ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काहीच केले नाही. दरम्यान जनता क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष विजय सोनवले यांच्या जागेत कोणीतरी अतिक्रमण केले होते. याबाबत त्यांनी ऑक्टोबर 2018 ला कराड तहसीलदार व गटविकास अधिकार्यांना अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु तत्कालीन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी यावर कसलीच कार्यवाही केली नाही.
त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी आपल्या गावाचा सिटी सर्व्हे झाला नाही त्यामुळे हा प्रकार घडला आहे असे सोनावले यांचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सोनावले यांनी प्रशासनाने गावची पाहणी करावी यासाठी ऑगस्ट 2021 ला सलग नऊ दिवस आंदोलन केले. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनानंतर मात्र प्रशासन जागे झाले. त्यावेळी तहसीलदार गटविकास अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत27 ऑगस्टला 2021 ला संपूर्ण घोणशी गावाची पाहणी करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते.
यावेळी ग्रामस्थांना आपल्या भूखंडाची कागदपत्रे, पुरावे घेऊन ग्रामपंचायत मध्ये सकाळी अकरा वाजता हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान सर्व ग्रामस्थ 27 ऑगस्टला अकरा वाजल्यापासून तहसीलदार ,गटबिकास अधिकारी यांची वाट पाहत थांबले होते. मात्र दिवसभरात प्रशासनातील कोणताही अधिकारी घोणशी गावाकडे फिरकलेच नाहीत. शेवटी ग्रामसेवकांनी अधिकार्यांना तातडीचे काम निघाल्यामुळे अधिकारी येऊ शकले नाही असा निरोप ग्रामस्थांना दिला गेला.
त्यावेळी प्रशासनाने पुढील तारीख जाहीर केली होती. त्या तारखेलाही अधिकार्यांनी नेहमीप्रमाणे दांडी मारली. त्यानंतर विजय सोनवले व घोणशी ग्रामस्थांनी डिसेंबर 2022 मध्ये दोन वेळा आंदोलन केले. त्यावेळीही प्रशासनाने थातूमातूर कारण देत आंदोलन थांबवले. त्यानंतर ऑक्टोबर 2023 ला पुन्हा एकदा विजय सोनावले व घोणशी ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यावेळीही प्रशासनाने ग्रामस्थांची बोळवण करत आंदोलन स्थगित करायला लावले.
दरम्यान जून 2025 व जुलै 2025 रोजी पुन्हा एकदा विजय सोनवले व ग्रामस्थांनी घोणशी गावाची संपूर्ण पाहणी करावी व सिटी सर्व्हे करावा यासाठी अर्ज दिला आहे. गेल्या पन्नास वर्षात अनेक अर्ज, आंदोलने, उपोषणे झाले तरीही प्रशासनला जाग येत नाही. त्यामुळे घोणशी ग्रामस्थांना न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
घोणशी ग्रामस्थांचा प्रशासनाकडे गावाचा सिटी सर्व्हे व्हावा याबाबत 50 वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे; मात्र प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नाहीत हे मोठे दुर्दैव असून आमच्या गावाचा तात्काळ सिटी सर्व्हे करावा आणि या त्रासातून आम्हाला मुक्त करावे.- माणिकराव पाटील, माजी संचालक सह्याद्री सहकारी कारखाना