वाई : प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. संबंधित कर्मचारी दररोज मंडळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. मंडळांनी कमिटीची नोंदणी करावी, महावितरणकडून अधिकृत तात्पुरता वीजमीटर घ्यावा आणि मंडप व स्टेज सुरक्षित ठेवावे. मिरवणुकीतील वाहनांची आरटीओ तपासणी होणार नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी दिला.
पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, श्रीकांत सावंत, दिनेश खैरे, प्रथम शिंदे, महिला दक्षता समितीच्या सदस्या जागृती पोरे, ज्योती गांधी, सुधा साबळे, मंजिरी पानसे, तनुजा इनामदार यांच्यासह गणेश मंडळाचे पदधिकारी व नागरिक उपस्थित होते.
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी देखाव्यांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, धोकादायक वीज तारांचा तातडीने बंदोबस्त आणि नियमानुसार डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, डॉल्बीच्या मुद्द्यावर नागरिक व लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. हॉस्पिटल परिसरातही डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, गणेशोत्सवाच्या नावाखाली अश्लील नृत्य आणि व्यसनांना मिळणारे प्रोत्साहन यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी मंडळांना सर्व आवश्यक परवानग्या वेळेत घेणे, ध्वनीमर्यादा व मिरवणुकीच्या नियमांचे पालन करणे, तसेच सोशल मीडियावर अफवा किंवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित न करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक मंडपात सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सवात रक्तदान, आरोग्य तपासणी यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, अशी सूचना केली.