सातारा गणेशोत्सव सजीव देखावे 
सातारा

Ganeshotsav News : साताऱ्यातील रस्ते गणेशभक्तांनी ओसंडले

देखावे पाहण्यासाठी लोटला जनसागर : ऐतिहासिक, शौर्य व सामाजिक प्रश्नांना उजाळा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले आकर्षक देखावे गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणपती-गौरी विसर्जनानंतर हे देखावे नागरिकांसाठी खुले झाले असून, दररोज हजारो गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हे देखावे पाहण्‍यासाठी रात्री जागू लागल्‍या आहेत. या जिवंत देखाव्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, राजमाता जिजाऊंचे धैर्य, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, महिला सन्मान, अन्न भेसळ, मराठी शाळांची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर प्रकाश टाकण्‍यात आला आहे.

राजपथ येथील मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाने 'राजमाता जिजाऊंचे धैर्य आणि शिवबाची बुद्धिमत्ता' या विषयावर जिवंत देखावा साकारला आहे. १२ मिनिटांच्या या सादरीकरणात १४ कलाकार सहभागी झाले आहेत. शनिवार पेठेतील सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाने 'मराठी शाळा जगली पाहिजे' या विषयावर १३ मिनिटांचा जिवंत देखावा सादर केला आहे. १२ कलाकारांच्या सहभागातून राज्यातील मराठी शाळांची सद्यस्थिती आणि त्यांच्यासमोरील प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

बालविकास गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ यांच्याकडून 'तिरुपती बालाजी' हा भव्य जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. १६ ते १८ मिनिटांच्या या देखाव्यात ६० कलाकारांसह ४० सहकारी सहभागी आहेत. भगवान तिरुपती बालाजी अर्थात श्री व्यंकटेश्वर स्वामी यांच्या उत्पत्तीची कथा या माध्यमातून सादर केली जात आहे.

अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ यांनी अन्न भेसळीच्या प्रश्‍नावर आधारित जिवंत देखावा उभारला आहे. अन्न भेसळीविरोधातील कारवाई आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचे पडसाद या देखाव्यातून दाखवण्यात येत आहेत. १६ मिनिटांच्या या देखाव्यात २० कलाकार सहभागी आहेत. फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून 'जागर स्‍त्री शक्तीचा' हा जिवंत देखावा सादर केला जात आहे. १७ कलाकारांचा सहभाग असलेल्या १८ मिनिटांच्या या देखाव्यात सध्याच्या काळातील महिलांची परिस्थिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्‍त्रीला दिला जाणारा सन्मान यांची तुलना करण्यात आली आहे.

शनिवार पेठेतील श्री गजराज गणेशोत्सव मंडळाने 'रणधुरंधर सरसेनापती प्रतापराव गुजर – वेडात वीर मराठे दौडले सात' हा १७ मिनिटांचा जिवंत देखावा साकारला आहे. या देखाव्यात सुमारे २५ कलाकार सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी पराक्रम गाजवणाऱ्या वीरांच्या शौर्याची गाथा यातून उलगडण्यात आली आहे.

समर्थ मंदिर परिसरातील समर्थ गणेशोत्सव मंडळाने मोहीम महिषासूर मर्दिनी हा महिला अत्याचाराच्या प्रश्‍नावर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. २० मिनिटांच्या या देखाव्यात १५ कलाकार सहभागी असून, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला महिला सन्मान आणि महिलांच्या सुरक्षेचा संदेश देण्यात आला आहे. गुरूवार पेठेतील श्रीमंत बालस्फूर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि प्रेरणादायी इतिहासावर आधारित जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. तर शिवतीर्थ येथील आठ रस्ता गणेशोत्सव मंडळाने डिजिटल देखावा उभारला असून, दररोज वेगवेगळ्या देवतांची माहिती थ्रीडी स्वरूपात दाखवण्यात येत आहे. धस कॉलनीतील जय महाराष्ट्र गणेश मंडळाने यांनी 'केदारनाथच्या माध्यमातून बारा ज्योतिर्लिंग दर्शन' हा देखावा साकारला आहे. भूविकास बँक परिसरातील शिवेंद्रराजे मित्र समूहाने अंबाबाई मंदिराचा भव्‍य दिव्‍य सेट अप उभा केला आहे. याशिवाय शहरातील अन्य गणेश मंडळांनी विविध मंदिरांचे आकर्षक सेट उभारून विद्युत रोषणाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT