सातारा

Satara Ganesh Festival : जिल्‍ह्यात विघ्‍नहर्ते थाटात विराजमान

विघ्नहर्त्या बाप्पांचे सर्वत्र ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत

पुढारी वृत्तसेवा

सातारा : बुद्धीची देवता व मांगल्याचे प्रतीक असलेले गणपती बाप्पा सोमवारी शाहूनगरीसह जिल्ह्यात थाटामाटात स्थानापन्न झाले. विघ्नहर्त्या बाप्पांचे सर्वत्र ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘मोरया... मोरया...’ च्या गजरात बाप्पा दाखल झाल्याने सर्वत्र गणेशभक्तीला उधाण आले.

जिल्ह्यात ५८४ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवली. दरम्यान, जिल्ह्यात घरगुती सुमारे २ लाख ६६ हजार ५०४ गणपतींसोबतच सुमारे ६ हजार २५६ सार्वजनिक मंडळांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केल्याने अवघे जनजीवन बाप्पामय होऊन गेले.

बाप्पाचे आगमन होणार असल्याने गेल्‍या ८ दिवसांपासून बालगोपाळ तसेच तरुणांमध्ये दांडगा उत्साह होता. घरगुती बाप्पांना घरी घेऊन जाताना ढोल-ताशांचा गजर केला जात होता. ‘गणपती बाप्पा मोरया..., आला रे आला आमचा बाप्पा आला’ अशा घोषणा देत गणेशभक्त बाप्पा मार्गस्थ होत होते. जिल्ह्यात चैतन्य आणि मांगल्याचे उत्सवपर्व असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली. रविवारी रात्री काहींनी तर सोमवारी सकाळपासूनच ढोल-ताशांच्या निनादात ‘बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया’चा अखंड गजर करत बाप्पांची स्वारी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी दाखल झाली आणि पुढचे ११ दिवस साजर्‍या होणार्‍या उत्सवातील आनंदाची उधळण सुरू झाली.

सकाळपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीमुळे सातार्‍यासह सर्वच शहरातील रस्ते गजबजून गेले होते. डॉल्बीवरील निर्बंधांमुळे बाप्पांच्या स्वागत मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. शहरातील विविध मंडळांच्या मिरवणुका लक्षवेधक व शिस्तबद्ध ठरल्या. अनेक मंडळांनी ट्रॅक्टर-ट्रॉली आकर्षक फुलांची सजावट केली होती.

सातारा शहरातील सम्राट गणेश मंडळ, प्रतापसिंह मंडळ, श्रीमंत महागणपती, शेटे चौकातील प्रकाश मंडळ, सोन्या मारुती मंडळ, शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळ, मंडईचा राजा, केसरकर पेठ येथील बाल हनुमान गणेशोत्सव मंडळाचा केसरकर पेठेचा राजा मंडळांसह विविध शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये गणेशाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

पारंपारिक वाद्यांचाच दणदणाट...

बाप्पांच्या स्वागतावेळी बहुतांश मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांमध्ये अनेक मंडळांनी ढोल-ताशांचा गजर केला. काही मंडळांनी पालखीतून टाळ-मृदुंगाच्या गजरात तर काहींनी घंटानादात बाप्पांची मिरवणूक काढली. त्यामुळे बाप्पांच्या आगमनमाच्या मिरवणुकीमध्ये डीजेला फाटा मिळाल्याने खर्‍या अर्थांने पारंपारिक पध्दतीने आगमन सोहळे पार पडले. ग्रामीण भागातील गणेश मंडळांनीही पारंपारिक वाद्यांसह वाजत -गाजत बप्पांचे स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT