सातारा : ‘गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला... चैन पडेना आम्हाला’, अशा जयघोषात फुलांची उधळण करत, पारंपरिक वाद्यांच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ६६७ गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. २६ हजार ७२८ घरगुती बाप्पांनाही भक्तिभावाने निरोप दिलाला. साताऱ्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक उद्या शुक्रवारी निघणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप दिला. शेटे चौकातील प्रकाश गणेश मंडळाच्या मानाच्या शंकर पार्वती गणेशाची दुपारी १ च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शंकर-पार्वती गणेश मिरवणुकीत श्रींच्या रथावर आकर्षक फुलांची सजावट, जागोजागी रांगोळी रेखाटन, विद्युत रोषणाईच्या आकर्षक़ छत्र्या, ढोलताशांचा गजर अन् गणेशभक्ताकडून होणारा बाप्पा मोरयाचा जयघोष यामुळे वातावरणात भक्तीमय वातावरण होते.
त्यानंतर शहरातील मंडईचा राजा मंडळाची मिरवणूक सुरू झाली. गुरुवार पेठेतील क्रांती गणेशोत्सव मंडळ तसेच मल्हार पेठेतील तरुण गणेश उत्सव मंडळाची विसर्जन निवडणूक लक्षवेधक ठरली. भोसले मळ्यातील महागणतीच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचा सहभाग राहिला.
अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मुख्य विसर्जन तळ्यात सातारा शहरातील २८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या तर जिल्ह्यात ६६७ सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांना व १९ हजार ५१७ घरगुती बाप्पांनाही निरोप दिला. यामध्ये ’एक गाव एक गणपती’ उपक्रमातील २८ गणेश मूर्तींचा समावेश आहे. मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा दणदणाट राहिल्याने उत्सवाचा गोडवा वाढला होता.
अनंत चतुर्दशीला राजवाडा येथे सातारा नगरपालिकेच्या मध्यवर्ती गणेश मंडळाच्या मूर्तीचे सायंकाळी ५ वाजता विसर्जन होणार आहे. त्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मानाचा सम्राट महागणपती तसेच मोती चौकातील प्रतापसिंह गणेश मंडळाची मिरवणूक सुरु होणार आहे. पालिकेच्यावतीने करंजेत मुख्य विसर्जन स्थळी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महाकाय क्रेनसह व्यवस्था केली आहे.
गणपती बाप्पांचे निर्विघ्न विसर्जन व्हावे, यासाठी जिल्ह्यात सुमारे ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून त्याद्वारे भिरकिट सुरू आहे. रस्त्यावरील बंदोबस्तासह ड्रोन व सीसीटीव्हीद्वारेही पोलिसांचा गर्दीवर वॉच राहणार आहे. सर्व शहरांसह ग्रामीण भागातही तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मिरवणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. १ पोलिस अधीक्षक, १ अपर पोलिस अधीक्षक यांच्यासह ८ पोलिस उपअधीक्षक, १२१ पोलिस अधिकारी, २१०० पोलिस अंमलदार, १ एसआरपीएफ कंपनी, ३ आरसीपी पथक, १ क्यूआरटी पथक, ११०० गृहरक्षक असा बंदोबस्त असेल. जिल्ह्यामध्ये निघणाऱ्या मिरवणुका व इतर कार्यक्रमांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्यासह ८ ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सातारा शहर, कराड शहर, फलटण, वाई, या प्रमुख शहरासह संपूर्ण जिल्हयामध्ये दंगा काबू योजना रंगीत तालीम व रूट मार्च, कोबिंग ऑपरेशन घेण्यात आलेले आहेत. गणेशोत्सव अनुषंगाने प्रमुख शहरामध्ये शांतता कमिटी मिटींग झाली. मिरवणुकीवेळी जातीय सलोखा भंग होईल अशा प्रकारच्या प्रक्षोभक, आक्षेपार्ह घोषणा देण्यात येऊ नयेत. प्लाझ्मा, लेझर बिमसह लेझर लाईट, साऊंड प्रेशर मिडवर बंदी असल्याने वापर करता येणार नाही. ध्वनिप्रदूषण कायद्याखाली दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांनी त्यांच्या तक्रारी डायल ११२ यावर कराव्यात. सर्व गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिप्रदूषण कायद्याने दिलेल्या मर्यादेचे पालन करावे. नियमांचे व कायद्यांचे उल्लघंन केल्यास संबंधित मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे.
नोटीस, प्रतिबंधात्मक कारवाईचा पाऊस
गणेशोत्सव अनुषंगाने नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत एकूण १५ हजार ६०० लोकांना नोटीस बजावली आहे. प्रतिबंधक कारवाई १ हजार ४७० जणांवर केली आहे. नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत ४६७ जणांना हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंधित केले आहे. तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये ३८ जणांना तडीपार केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.