सातारा : शेतजमीन नावावर करून देतो, असे सांगून वेळोवेळी 25 लाख रुपये घेऊन पैसे व जमीन न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलिस दलातील कर्मचाऱ्यासह तिघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित पोलिसाने काही साईड बिझनेसच्या अडचणीमुळे पैशांची गरज असल्याचे सांगितल्याचे समोर येत आहे.
सागर दिलीप भुजबळ, दिलीप आनंद भुजबळ, मयुर दिलीप भुजबळ अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील सागर भुजबळ हा पोलिस आहे. याप्रकरणी धैर्यशील मारुती देशमुख (रा. विकासनगर, खेड, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पोलिस व तक्रारदार यांची पोलिस क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून ओळख झाली आहे. दोघांची मैत्री झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट सन 2024 मध्ये सागर भुजबळ याने तक्रारदार यांना सांगीतले की, माझा साईड बिझनेस आहे. मी प्लॉट खरेदी विक्री करतो. तसेच पूर्ण भारतात असणाऱ्या एका नामांकित विद्यालयांना स्कुल बॅगचे टेंडर घेतो.
पैशांची काही अडचण असल्याचे सांगून आर्थिक मदत करण्याची विनंती केली. यावर तक्रारदार यांनी पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संशयित पोलिसाने अंगापूर ता.सातारा येथे त्यांची वडीलोपार्जित शेत जमीन विकणार असल्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी शेतजमीन घेण्याची संमती दर्शवली.
मात्र संशयित पोलिसाने शेत जमीनीचे सध्या वेळेअभावी नोटरी साठेखत करुन देतो व नंतर रजिस्टर खरेदी दस्त करु असे सांगितले. त्यानुसार नोटरी संशयित तिघांशी तक्रारदार यांनी केले. तक्रारदार यांनी आरटीजीएसद्वारे 15 लाख रुपये दिले. तसेच रोख 10 लाख रुपये असे एकूण 25 लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतरही जमीन नावावर केली जात नसल्याने व पैसेही दिले जात नसल्याने अखेर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.