Leopard pudhari
सातारा

Satara News : बिबट्याबाबत अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्याचा वनविभागाचा इशारा

बिबट्या दिसल्याच्या नावाखाली जुने, बनावट अथवा अन्य ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले

पुढारी वृत्तसेवा

कण्हेर : सातारा जिल्ह्यात बिबट्या दिसल्याच्या नावाखाली जुने, बनावट अथवा अन्य ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. या चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर प्रसारित होणारे बिबट्या किंवा अन्य वन्यप्राण्यांशी संबंधित फोटो, व्हिडिओ अथवा संदेशांची खात्री केल्याशिवाय ते पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन सातारा वनपरीक्षेत्राचे अधिकारी संदीप जोपळे यांनी केले.

बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच काही जण कोणतीही शहानिशा न करता जुने किंवा अन्य भागातील छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करतात. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. अनेकदा वन विभागालाही अशा संदेशांची दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी जावे लागते. त्यामुळे मनुष्यबळ आणि वेळ विनाकारण खर्च होऊन वन विभागाच्या नियमित कामावर परिणाम होत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी प्रत्यक्ष आढळल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर ठेवून तातडीने जवळच्या वन विभागाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत अधिकृत माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्यावरच विश्वास ठेवावा. समाजमाध्यमांवरील संदेशांवर केवळ छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफित पाहून विश्वास ठेवू नये. बनावट फोटो अथवा ध्वनिचित्रफित तयार करून त्याद्वारे वन्यप्राण्यांबाबत अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सातारा वन विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT