खैराची २१ झाडे तोडताना तिघे वनविभागाच्या जाळ्यात 
सातारा

Satara Tree Felling| खैराची २१ झाडे तोडताना तिघे वनविभागाच्या जाळ्यात

तिघांना एक दिवसाची वनकोठडी

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : कोरेगाव वनपरिक्षेत्रातील फडतरवाडी व भाडळे येथील राखीव वनक्षेत्रात कटर मशीनच्या साहाय्याने खैराची २१ झाडे तोडणाऱ्या तिघांना वनविभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत दोन कटर मशीन, अल्टो कार आणि तोडलेले लाकूड जप्त करण्यात आले आहे. तिन्ही संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, फडतरवाडी आणि भाडळे येथील राखीव वनक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी गस्त घालत होते. यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास वनक्षेत्रात वृक्षतोड सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी वृक्षतोड करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना वनक्षेत्रातच पकडण्यात आले. तपासादरम्यान सूरज धनाजी बुधावले आणि शुभम दिलीप धायगुडे (दोघेही रा. पाडळी, ता. खंडाळा) यांनी वैभव धनाजी धायगुडे (रा. पाडळी) याच्या सांगण्यावरून कटर मशीनच्या साहाय्याने २१ खैर वृक्षांची तोड केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच १२ ईजी ३९९७ क्रमांकाची अल्टो कार, दोन कटर मशीन आणि तोडलेले लाकूड वनविभागाने जप्त केले आहे. तिन्ही संशयितांना कोरेगाव न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना एक दिवसाची वनकोठडी सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्यासह वनपाल, वनरक्षक व वनमजुरांच्या पथकाने केली. पुढील तपास वनपाल सुरेखा जगदाळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT