सातारा : सर्वत्र बाप्पांच्या भक्तीचा जागर सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये यावर्षी सजावटीमध्ये ऐतिहासिक वास्तू व पौराणिक मंदिरांना स्थान देण्यात आले आहे. राजधानी सातार्यात ऐतिहासिक देखाव्यांवर भर दिला जात आहे. जिवंत देखाव्यांमधून इतिहासाला उजाळा मिळत असून ऑपरेशन सिंदूरसारख्या जिवंत देखाव्यातून देशप्रेम वृध्दींगत होण्यास मतद होत आहे. या देखाव्यांचे आकर्षण असल्याने ते पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी वाढू लागली आहे.
गणेशोत्सवामध्ये भव्य गणेश मूर्ती, सजावट पाहण्यासाठी नेहमीच गणेश भक्तांची गर्दी होते. सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे जिल्ह्यातील गणेश भक्तांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहेत. यावर्षीदेखील हे देखावे गौरी आवाहनाबरोेबर खुले झाले आहेत. घरगुती उत्सवातील बहुतांश गणेश मूर्तींचे विसर्जन देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. यावर्षी सातारा शहरात राजपथावरील मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाने वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाच्या घटनेवर जिवंत देखावा सादर केला आहे. त्यामुळे पन्हाळ्याच्या वेड्यातून बाहेर पडताना छत्रपतींच्या वेशात शिवा काशीद शहीद झाला होता. त्याच्या बलिदानाने छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे रवाना होऊ शकले होते. तर फुटका तलाव ट्रस्ट गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर हा जिवंत देखावा सादर केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध हा जिवंत देखावा पाहताना राष्ट्रप्रेमाने गणेश भक्तांचा ऊर भरुन येत आहे. शनिवार पेठेतील बालविकास गणेशोत्सव मंडळाने स्वामी समर्थ जिवंत देखावा सादर करुन उत्सवाच्या आध्यात्मिक वातावरणाचे पावित्र्य आणखी वाढत आहे.
श्री गजराज गणेशोत्सव मित्र मंडळ सोमवार पेठेत वीर कोंडाजी फर्जंद जिवंत देखावा, अजिंक्य गणेश मंडळ, सोमवार पेठेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर जिवंत देखावा, पोवई नाका येथील बांधकाम विभागात किल्ले अजिंक्यतारा प्रतिकृती, मंगळवार पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने केदारनाथ मंदिर साकारले आहे. शनिवार पेठेतील जयजवान गणेश मंडळाने जलमंदिर पॅलेसची प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा छत्रपतींच्या इतिहासाला उजाळा देण्यात येत आहे. हे देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे.