सातारा : सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथील बस स्टॉपवर सोमवारी रात्री बाचाबाची झाल्यानंतर बंदूक काढून हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसर हादरून गेला असून, तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पिस्तुल जप्त करून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
महेश जालिंदर माने (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेश संतोष माने (वय २८, दोघे रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. कारंडवाडी गावात संशयित थांबला असताना तक्रारदार त्याच्या मित्रासाेबत तेथून निघाला होता. यावेळी बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पिस्तुल काढत दहशत माजवत थेट हवेत गोळीबार केला. गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला व भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरात ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमले.
पोलिसांनी याची माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी विपुल पाटील, पोनि नीलेश तांबे यांच्यासह तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी गोळीबाराच्या अनुषंगाने काही पुरावे आढळून आले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. यावेळी पोलिसांनी अधिक माहिती घेऊन संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून बंदुक जप्त केले.