सातारा

Satara News: “गाढव आहे” बॅनरची चर्चा; तरीही कचरा तसाच

गोळेश्वर ग्रामपंचायतीचा उपरोधिक फलकही निष्फळ; नागरिकांच्या बेफिकीरीवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

कराड : स्वच्छता अभियानासाठी विविध जनजागृती उपक्रम राबवले जात असतानाही काही नागरिक मात्र कचरा टाकण्याची सवय सोडण्यास तयार नसल्याचे चित्र कार्वे नाका ते कार्वे दरम्यान दिसून येत आहे. गोळेश्वर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावर गोळेश्वर ग्रामपंचायतीने “येथे कचरा टाकणारा गाढव आहे” अशा उपरोधिक आशयाचा बॅनर लावला आहे. हा फलक सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे बॅनर वाचूनही नागरिक त्याच ठिकाणी कचरा टाकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गोळेश्वर ग्रामपंचायतीने नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबावेत, या उद्देशाने हा अनोखा प्रयोग केला. मात्र वास्तवात बॅनरखालीच पुन्हा कचऱ्याचे ढिग दिसत असल्याने नागरिकांच्या निष्काळजी वृत्तीचे दर्शन घडत आहे.

परिसरातून जाणारे प्रवासी व स्थानिक नागरिक या फलकाचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काहींनी ग्रामपंचायतीच्या कल्पकतेचे कौतुक केले, तर काहींनी “फलक नव्हे, मानसिकता बदलण्याची गरज” असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

स्वच्छ गावासाठी ग्रामपंचायतीसोबत नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कार्वे नाका ते कार्वे दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. गोळेश्वर ग्रामपंचायतीची घंटागाडी सुरू आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तरीही नागरिक रस्त्याकडेला कचरा टाकत आहेत. येथे कचरा टाकणारा गाढव आहे असा बॅनर ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तरी बॅनरच्या शेजारीच कचरा टाकला जात असल्याने नागरिकांच्या मानसिकतेबद्दल संताप व्यक्त होत आहे. रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT