सातारा

Satara Farmers Protest : कुणाची पेटली चूल, कुणाची अडकली दिवाळी

ट्रकच्या केबिनमध्ये स्वयंपाक, रस्त्यावरच चहापाणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : नेहमी हजारो वाहनांच्या वेगाने धावणारा पुणे-बंगळूर महामार्ग... गाड्यांचे हॉर्न, धावपळ आणि वाहनांचा अखंड आवाज... मात्र बुधवारी याच महामार्गाचे चित्र पूर्णपणे बदलले होते. कुठे वाहनांच्या लांबच लांब रांगा, कुठे ट्रकच्या केबिनमध्ये पेटलेली चूल, तर कुठे रस्त्यावरच चहापाणी करणारे वाहनधारक! शेतकरी आंदोलनामुळे महामार्गावर चक्काजाम झाला आणि हजारो प्रवाशांना तब्बल २४ तासांहून अधिक काळ रस्त्यावरच अडकून पडावे लागले.

दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी निघालेली कुटुंबे, माल घेऊन निघालेले ट्रकचालक, टँकर चालक आणि प्रवासी या कोंडीत अडकले. सुरुवातीला काही वेळात वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तासामागून तास उलटत गेले, तरी वाहनांच्या चाकांना गती मिळाली नाही. अखेर अनेकांनी वाहनातच रात्र काढली. प्रवासाचा थकवा, जेवणाची चिंता आणि पुढे कधी जाता येईल, याची अनिश्‍चितता अशा परिस्थितीत वाहनधारकांची अक्षरशः दमछाक झाली.

रस्त्यावर तासन्‌तास उभे राहिलेल्या ट्रकचालकांनी अखेर आपल्या वाहनातच अन्न शिजवण्याचा मार्ग स्वीकारला. ट्रकच्या केबिनमध्ये बसून स्वयंपाक करायचा, तिथेच जेवण तयार करायचे आणि तिथेच खायचे, अशी वेळ त्यांच्यावर आली. घरापासून दूर, रस्त्यावरच्या या मुक्कामात केबिनच त्यांचे घर आणि महामार्गच त्यांचे अंगण बनले होते. सामान्यतः क्षणभरही न थांबणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

काही ठिकाणी वाहनांच्या तीन रांगा तयार झाल्या होत्या, तर महामार्गाची एक बाजू पूर्णपणे मोकळी होती. त्यामुळे रस्त्यावर वाहने नसल्याचे दुर्मीळ चित्र पहायला मिळाले. काही वाहनचालकांनी रस्त्यावरच चहा पाण्याची व्यवस्था केली. प्रवाशांनी वाहनातून बाहेर पडून थोडा वेळ चालत पाय मोकळे केले. काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहने थांबवण्यात आली होती.

आता तरी समजणार का शेतकर्‍यांच्‍या वेदना?

नागठाणे येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक रोखण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा वाढत गेल्या. तब्बल २४ तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी कायम राहिल्याने वाहनधारकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुरू असलेले आंदोलन आणि त्यातून निर्माण झालेली ही वाहतूक कोंडी यामुळे महामार्गावरील सामान्य माणसाचे जगणे काही काळ ठप्प झाले. यामुळे काही वेळ का होईना सर्वसामान्‍यांना शेतकर्‍यांच्‍या वेदना कळतील का? असा प्रश्‍न पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT