सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची पाचवी यादी प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला या यादीमुळे गती मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया, ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण आणि फार्मर आयडी यांसंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ५२६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ३४ हजार ९६० शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच २९ हजार ७०५ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. आधार संलग्नतेची प्रक्रिया पूर्ण केल्याची नोंद आहे. कर्जमाफीच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रियांमध्ये अद्याप काही शेतकरी मागे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २१९.९० कोटी रुपयांच्या कर्ज माफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ६ हजार ५६६ आहे. तसेच २ हजार ९८९ शेतकऱ्यांचा फार्मर आयडी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरणासंदर्भातील आकडेवारीनुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३ हजार ९६९ आणि अन्य बँकांचे ३१७ असे एकूण ४ हजार २८६ शेतकरी या नोंदीत आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण आणि फार्मर आयडीसंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून कर्जमाफीच्या लाभाबाबतची सद्यस्थिती तपासावी, असे आवाहन संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.