Pudhari
सातारा

Satara News: टॉवर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

डावरीतील घटना : विंड पॉवर कंपनीचा टॉवर; एक गंभीर

पुढारी वृत्तसेवा

मारूल हवेली : रत्नागिरी विंड पॉवर कंपनीचा हवा मोजण्याचा टॉवर मुळापासून तुटून अंगावर पडल्याने एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मरळी विभागातील डावरी (ता. पाटण) येथे शनिवारी सायंकाळी घडली.

तुकाराम आनंदा सत्रे (वय 45, रा. डावरी, ता. पाटण) यांचा जागीच मृत्यू झाला असून शरद अण्णा सत्रे (वय 39, रा. डावरी) हे गंभीर जखमी झाले आहेत. मल्हारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, 7 मार्चला सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास डावरी गावच्या हद्दीतील ‌‘कनाटा‌’ नावाच्या शेतामध्ये फिर्यादी अशोक पांडुरंग सत्रे यांचा पुतण्या तुकाराम सत्रे व शरद सत्रे यांनी आपली जनावरे चरण्यासाठी सोडली होती.

सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास जनावरे आणण्यासाठी ते दोघेही पुन्हा त्या ठिकाणी गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. दरम्यान रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास शरद सत्रे यांनी अर्जुन सत्रे यांच्या मोबाईलवर फोन करून तुकाराम व माझ्या अंगावर विंड मास्ट टॉवर पडला आहे. तुम्ही लवकर कनाटा शेतात या, असे सांगून फोन ठेवला.

ही माहिती मिळताच फिर्यादी अशोक सत्रे व अर्जुन सत्रे यांनी गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सुमारे 15 ते 20 जणांनी बॅटरीच्या प्रकाशात कनाटा शेतात जाऊन शोध सुरू केला. त्यावेळी तुकाराम सत्रे यांच्या पोटाला रत्नागिरी विंड पॉवर कंपनीच्या टॉवरच्या तारा गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे त्यांचे पोट फाटून कोथळा बाहेर आला होता, तसेच डावा पाय व मान तुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर शरद सत्रे हे काही अंतरावर पडलेले असून त्यांच्या पायाला व अंगाला टॉवरच्या तारा गुंतल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ वाहनाने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत अशोक पांडुरंग सत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी विंड पॉवर कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT