Milk Production Pudhari
सातारा

Satara Milk Adulteration: होळ बोगस दूध निर्मितीचे बारामती कनेक्शन, सोमनाथ डेअरीचालकांना सहआरोपी करण्याचा प्रस्ताव

निरेतील व्यापार्‍याकडून पावडर खरेदी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : फलटण तालुक्यातील होळमधील बोगस दूध निर्मितीचे बारामती कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील सोमनाथ डेअरीकडून बोगस दूध खरेदी केले जात असल्याचे समोर आल्याने गुन्हा दाखल केला असून डेअरीच्या पदाधिकार्‍यांना सहआरोपी करावे, अशी मागणी अन्न व औषध प्रशासनाने न्यायालयाकडे केली आहे. या रॅकेटने बोगस दूध निर्मितीसाठीचे साहित्य निरा (ता. पुरंदर) येथील मोरे नावाच्या व्यापार्‍याकडून खरेदी केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

होळ, ता. फलटण येथे उघडकीस आणलेल्या बोगस दूध तयार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची व्याप्ती वाढवली असून तपासात बरेच धागेदोरे समोर आले आहेत. होळ येथे तयार केलेले बोगस दूध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकरमधील सोमनाथ डेअरीकडून संकलित केले जात असल्याचे समोर आले आहे. सोमनाथ डेअरीच्या पदाधिकार्‍यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई प्रस्तावित केली आहे.

त्यामध्ये डेअरीचे चेअरमन सोमनाथ मधुकर होळकर, सदस्य बाळासो मधुकर होळकर, संजय सुभाष होळकर, बाबूराव सखाराम होळकर, सुरेश भाऊसो जाधव, अनिल भाऊसो होळकर, माणिकराव आनंदराव माने, भिमराव मारूती पोटे, दादासो अशोक होळकर, ताईबाई सोमनाथ होळकर, सुवर्णा बाळासो होळकर सर्व रा. लोहारचारी, होळ (ता. बारामती) यांचा समावेश आहे. या प्रकरणात या पदाधिकार्‍यांना सहआरोपी करावे, अशी मागणी अन्न व औषध विभागाने न्यायालयाकडे केली आहे. सोमनाथ डेअरीकडून नंदन डेअरीकडे (केरळ) पाठवण्यात येत असल्याचे समोर येत असून त्यानुषंगाने यंत्रणा तपास करत आहे.

होळ येथील बोगस दूध तयार करणार्‍या रॅकेटने निरा (ता. पुरंदर) येथील व्यापारी मोरे याच्याकडून व्हे पावडर तसेच नॉन डेअरी क्रीम पावडर खरेदी केल्याचे चौकशीत उघड झाले. मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बोगस दूध निर्मितीची पाळेमुळे संपूर्ण जिल्हाभर पसरल्याचे स्पष्ट होत असल्याने भेसळखोर दूधसम्राटांच्या मुसक्या आवळण्यासाठी एफडीएने व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT