Fake currency 
सातारा

Satara Fake currency case: बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस

उरूल सरपंचासह कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

मारूल हवेली : मल्हारपेठ पोलिसांनी उरूल (ता. पाटण) येथील धाडीत ५०० रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करत बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी उरूलच्या सरपंचासह त्याचा साथीदार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजेंद्र गणपतराव थोरात (वय ४२, रा. उरूल, ता.पाटण, जि. सातारा), नितीन जलदेव निकम (वय ४७, रा. उरूल, ता. पाटण, जि. सातारा), मनोज दशरथ निकम (वय ३६, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर), गौसपाक अब्दुलरज्जाक जमादार (वय ३९, रा. शिवाजीनगर कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), आशुतोष राऊत (रा. जयसिंगपुर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांना उरूल येथील राजेंद्र थोरात यांच्या घरात बनावट नोटा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत थोरात यांच्या घराची झडती घेतली. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरची तपासणी केली असता ५०० रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या १७ बनावट भारतीय चलनी नोटा आढळून आल्या.

या नोटांची एकूण दर्शनी किंमत ८,५०० रुपये आहे. याप्रकरणी सदर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स.पो.नि. हेमंतकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. या कारवाईत एक कार जप्त करण्यात आली असून बनावट नोटांचा स्रोत, त्या तयार करण्यामागील रॅकेट तसेच इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. अधिक तपास उपनिरिक्षक सोनम नाईक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT