liquor seized pudhari photo
सातारा

Satara Illegal Liquor Seized : महागडी कार; वाहतूक हातभट्टीची

सातारा एक्‍साईजकडून लाखोंची दारू जप्त : संशयितावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्‍ह्यातील निरा-लोणंद मार्गावरील पाडेगाव या गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने (एक्‍साईज) अवैध हातभट्टी दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली. या कारवाईत २१० लिटर हातभट्टी दारूसह व्होक्सवॅगन पोलो या महागडी कार असा एकूण ५ लाख २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रितीक विशाल चव्हाण (वय २७, रा. जेऊर, ता. पुरंदर जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. १९ नोव्हेंबर रोजी एक्‍साईज विभागाने ही कारवाई केली. सातारा जिल्‍ह्यातून हातभट्टी दारुची वाहतुक होत असल्‍याची माहिती एक्‍साईज विभागाला मिळाली. त्‍यानुसार निरा-लोणंद मार्गावरील पाडेगाव परिसरात भरारी पथकाने सापळा लावला. यावेळी संशयित व्होक्सवॅगन पोलो कार (क्र. एमएच १२ एचएल ४२९७) अडवून तपासणी केली असता त्‍यामध्ये ३५ लिटर क्षमतेचे हातभट्टी दारूने भरलेले सहा प्लास्टिक कॅन आढळले. त्यामध्ये एकूण २१० लिटर हातभट्टी दारू होती. एक्‍साईज विभागाने दारूसह ५ लाख रुपये किमतीची कार जप्त केली.

याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क साताराचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, विजय मरोड, सहायक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव यांच्यासह जवान अजित रसाळ, विनोद हिंगणे, रमेश भुजबळ, अमित क्षीरसागर, अजित घाडगे, बाळासाहेब पाचुंदे व किरण जंगम यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, जिल्ह्यात बनावट दारू अथवा हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT