विजेचे पोल वेलींनी गुरफटल्याने धोका 
सातारा

Satara News : विजेचे पोल वेलींनी गुरफटल्याने धोका

दुर्घटना घडण्याची भीती; लोंबकळणाऱ्या ताराही जीवघेण्या

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महावितरणच्या विद्युत पोलना अनेक ठिकाणी वेलींचा विळखा पडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी वीज वाहक तारा लोंबकळत असल्याने शॉर्ट सर्किट होवून अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी अशा काही घटनांमध्ये अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे विद्युत पोलची स्वच्छता करुन संभाव्य दुर्घटना टाळण्याची मागणी होऊ लागली आहे.

महावितरणचे बहुतांश विद्युत पोल हे शेतशिवारात आहेत. तसेच काही डीपी मानवी वस्तीजवळ आहेत. वीज पोलजवळ आर्थिंगची वायरही सोडण्यात येते. परंतू सद्यस्थितीत अनेक डीपी व पोलभोवती वेली व झाडेझुडपे वाढली आहेत. वेळीच वेलींची छाटणी न केल्याने संपूर्ण खांबच वेलींमध्ये गुंडाळला गेल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. आर्थिंगच्या वायरही दिसत नाहीत. विद्युत पोलजवळ गेल्यास अनुचित प्रकार घडल्यास अपघाताचा धोका संभवतो.

लोंबकळणाऱ्या वीज तारांचे शॉर्ट सर्किट होऊन उसाच्या फडांना आग लागण्याच्या घटना दरवर्षी सर्रास घडत असतात. ऊसतोड अंतिम टप्प्यात असून उसाची पाचट वाळलेेली असल्याने शॉर्ट सर्किट झाल्यास आग पटकन पसरुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आधीच शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच सुमारे 14 ते 18 महिने सांभाळलेले पीक पेटल्यास शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळते. त्यामुळे अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी महावितरणने लोंबकळणाऱ्या वीज तारांना वेळोवेळी ताण देणे गरजेचे आहे. तसेच पावसाळ्यानंतर विद्युत पोल व डीपींची परिसरासह स्वच्छता करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

काही डीपी तर नागरी वस्तीजवळ व काही शाळांजवळ असल्याचे चित्र ग्रामीण भागात काही ठिकाणी दिसून येते. अशा ठिकाणी दुर्घटना घडण्याचा धोका असल्यामुळे वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वीज वितरण मंडळाने सर्व्हे करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगात पूर्णत्वाकडे निघाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी उसाची तोडणी सुरू आहे. तोडणी केल्यानंतर खोडवा पिकाच्या उत्पादकेतेसाठी फडातील पाचट पेटवण्यात येत आहे. काही विजेचे पोल उसाच्या शेतात आहेत. उसाची पाचट पेटवताना अशा विद्युत पोलवरील वाळलेल्या वेली पेट घेण्याची शक्यता असते. असे झाल्यास विद्युत तारांना धोका पेोहचून तुटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT