सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता आरक्षण सोडत जिल्हाधिकारी स्वत: काढणार आहेत. तर पंचायत समितीच्या 130 गणासाठी तालुक्याच्या ठिकाणी सोडत काढण्यात येणार आहे. मनासारखे आरक्षण मिळावे यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. आपल्या गटात व गणात काय आरक्षण पडणार याबाबत उत्सुकता लागून राहिली असून सोडतीनंतरच राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या पावणेचार वर्षांपासून रखडल्या होत्या. सातारा जिल्हा परिषदेत 10 वर्षापूर्वी 67 सदस्य निवडून जात होते. त्यानंतर शहर आणि तालुका शहराच्या ठिकाणी नगरपंचायती, नगरपालिका झाल्या. त्यामुळे गटाची संख्या 64 आणि गणाची संख्या 128 वर आली. आताच्या रचनेत खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला आहे. सन 2017 च्या तुलनेत सातारा तालुक्यातील दोन गट कमी झाले आहेत.
मात्र आता सोमवार दि. 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत समितीच्या 130 गणासाठी आरक्षण सोडत निघणार आहे. वाई तालुक्यात 4 गट 8 गण, महाबळेश्वर तालुक्यात 2 गट व 4 गण, खंडाळा तालुक्यात 3 गट व 6 गण, फलटण तालुक्यात 8 गट व 16 गण, माण तालुक्यात 5 गट व 10 गण, खटाव तालुक्यात 7 गट व 14 गण, कोरेगाव तालुक्यात 6 गट व 12 गण, सातारा तालुक्यात 8 गट व 16 गण, जावली तालुक्यात 3 गट व 6 गण, पाटण तालुक्यात 7 गट व 14 गण, कराड तालुक्यात 12 गट व 24 गणाची रचना आहे.
या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी ही आरक्षण आहे. त्यामुळे ओबीसीसाठी किमान 17 गट राखीव राहण्याचा अंदाज आहे. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी 40, अनुसूचित जातीसाठी 7, अनुसूचित जमातीसाठी 1 गट राखीव राहण्याचा अंदाज आहे. या आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच आरक्षण आपल्या सोयीचे पडावे यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत.
या आरक्षण सोडतीत 65 जिल्हा परिषद गटामध्ये व 130 पंचायत समिती गणामध्ये काय होणार? याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र इच्छुकांची अवस्था गणा धाव रे... गटा पाव रे... अशी झाली आहे. मात्र आरक्षण सोडतीनंतरच गट व गणामध्ये राजकीय हालचालींना वेग येणार आहे. ऐन दिवळीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र मतदारांची दिवाळी होणार हे निश्चित झाले आहे.