सातारा : वृद्धेला केअर टेकर म्हणून असलेल्या महिलेने इन्सुलीनचे अधिक मात्राचे इंजेक्शन देऊन घरातून 5 तोळे वजनाच्या सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला. साथीदारासोबत केलेल्या या कृत्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 15 दिवसांनंतर शहर पोलिसांनी ही घटना शिताफीने उघडकीस आणली.
जहिरा रफिक शेख (वय 50, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) शैलेश हरिभाऊ साळुंखे (49, रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वैशाली वासूदेव किर्वे (68, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मूळ घटना दि. 14 ऑक्टोबर रोजी घडली आहे. तक्रारदार महिला वैशाली किर्वे यांना संधीवाताचा त्रास आहे. यामुळे गेल्या 15 वर्षांपासून जहिरा शेख ही त्यांची मॉलिश करण्यासाठी केअर टेकर म्हणून काम करत आहे. दि. 14 ऑक्टोबर रोजी जहिरा शेख हिने वृद्धेला संधीवाताचे हे चांगले इंजेक्शन आहे, असे सांगून ते दिले. वास्तविक ते इंजेक्शन इन्शुलीनचे होते. तसेच अधिक मात्रामध्ये दिले. यामुळे वृद्ध महिला बेडवरच बेेशुद्ध पडली. यानंतर संशयित महिलेने वृद्धेच्या हातातील 4 सोन्याच्या पाटल्या जबरदस्तीने काढून चोरल्या.
वृध्दा बेशुध्द असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस वृध्दा बेशुध्द होती. उपचारानंतर वृध्देला शुध्द आली. वृध्देच्या हातातील सोन्याच्या पाटल्या नसल्याचे लक्षात आले. यातूनच चार दिवसांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभाग तपास करत असताना संशयित केअर टेकर महिलेने वृध्देला इंजेक्शन दिल्याचे समजले. पोलिस तपासामध्ये संशयित महिलेची अधिक चौकशी केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. तसेच चोरीचा सर्व प्लॅन साथीदार शैलेश साळुंखे याच्यासोबत केल्याचेही सांगितले. शैलेश साळुंखे हा देखील मालिश करण्याची कामे करत आहे. पोलिसांनी दोघांकडे चौकशी करुन चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शाम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, सतीश मोरे, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार मोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.