सातारा

Satara Accident: वडाची फांदी अंगावर कोसळून वृद्धाचा मृत्यू

फिरायला गेलेल्या वृद्धाच्या अंगावर अचानक वडाच्या झाडाची मोठी फांदी कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

कण्हेर : पुणे-बंगळूर जुन्या राज्यमार्गावर फिरायला गेलेल्या वृद्धाच्या अंगावर अचानक वडाच्या झाडाची मोठी फांदी कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रल्हाद बाबुराव चोरगे (वय 76, रा. कोंडवे, ता. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. प्रल्हाद चोरगे हे सोमवारी सायंकाळी आपल्या मित्रासोबत जुन्या पुणे-बंगळूर राज्यमार्गावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक वडाच्या झाडाची मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.

घटनास्थळाजवळील वडाचे झाड अज्ञातांकडून जाळण्यात आल्याने ते कमकुवत झाले होते. त्यामुळे झाडाची फांदी अचानक कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत ट्रॅक्टर व विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले. चोरगे यांच्यासोबत असलेले जगन्नाथ घाडगे हे मात्र वेळीच सावध झाल्याने बचावले. गंभीर जखमी झालेल्या चोरगे यांना तातडीने सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

प्रल्हाद चोरगे हे सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, मोळाचा ओढा ते वर्ये मार्गालगत अनेक जुनी व जीर्ण झाडे धोकादायक अवस्थेत असल्याने ती तातडीने हटवावीत, अशी मागणी माजी सरपंच राजेंद्र चोरगे यांनी केली आहे. अज्ञातांकडून वडाची झाडे जाळण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने बांधकाम विभागाने याची गंभीर दखल घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT