सातारा : येथील वृद्धाला एका कंपनीची प्रतिनिधी बोलत असल्याचे खोटे सांगून महिलेने शेअर मार्केटचे आमिष दाखवत सुमारे १ कोटी ७१ लाख ३१ हजार ८४८ रुपयांना चुना लावला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.
अनन्या कुलकर्णी असे संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बाळ गंगाधर गाढवे (वय ७०, रा.करंजे, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना १ ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२६ या कालावधी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संशयित महिलेने तक्रारदाराला ऑगस्ट महिन्यात फोन केला. महिलेने डेल्टा टेक इन्व्हेस्ट या कंपनीची प्रतिनिधी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर व्हाॅटस्ॲपवर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळेल असे सांगितले. त्यानुसार संशयित महिलेने डेल्टाव्हर्स या नावाचे ॲप तक्रारदार यांना पाठवले.
तक्रारदाराने माहिती घेऊन संशयित महिला सांगेल त्यानुसार संबंधित ॲपवर पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. संशयित महिलेने त्या ॲपवर तक्रारदार यांना नफा होत असल्याचे भासवले. त्यानुसार आणखी पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी १ कोटी ७२ लाख रुपये गुंतवले. तक्रारदार यांना पैसे पाहिजे असल्याने संशयित महिलेने आणखी पैसे गुंतवावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने वेळोवेळी पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर संशयित महिलेने टाळाटाळ केली. तक्रारदाराने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारदाराची सर्व कागदपत्रे, पैसे गेल्याचे पुरावे पाहून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.