सातारा : कठोर परिश्रम, अथक कष्ट, अविश्रांत मेहनत, अपार इच्छाशक्ती अन् दुर्दम्य आशावाद यातून 67 वर्षांच्या एका वृद्धाने स्वतःच्या श्रमदानाने डोंगर खोदून आठ वर्षांपासून शंभू महादेवाच्या भक्तांसाठी साडेतीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. त्यांच्या या अनोख्या तपश्चर्येतून त्यांची ही यशोगाथा फळाला आली आहे.
अशोक तुकाराम जाधव यांच्या कर्तृत्वाची ही कहाणी असून ते करंडी (ता. सातारा) या गावचे रहिवासी आहेत. नाना या नावाने ते सर्वपरिचित आहेत. करंडी गावालगत डोंगर उंचावर शिलोबाचे देवस्थान आहे. परिसरातील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. यात्रा अन् नवरात्रोत्सवात येथे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात. भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. पायथ्यापासून शिलोबा गडावर जाणारी वाट अरुंद अन् खडतर होती. या पार्श्वभूमीवर आठ वर्षांपूर्वी नानांनी ही वाट रस्त्यात रूपांतरित करण्याचा ध्यास घेतला. रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत तिथे काम करत.
आरंभीच्या काळात काही युवकांची साथही त्यांना लाभली. मात्र, नाना अखेरपर्यंत आपल्या स्वप्नाच्या सार्थकतेसाठी धडपडत राहिले. त्यातून आज पायथ्यापासून डोंगराच्या वरील टोकापर्यंतचा पुरेशा रुंदीचा रस्ता साकारला गेला आहे. नानांच्या या आगळ्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिलोबा गडावर जाणारी आधीची वाट खूपच खडतर होती. आता मात्र लहान मुले, महिलादेखील सहजपणे वर पोचू शकतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून परिश्रमाचे खरेखुरे चीज झाल्यासारखे मला वाटते.-अशोक जाधव